प्रसिद्ध कवी व लेखक प्राचार्य आ. य. पवार यांचे वृद्धापकाळाने निधन

 


। अहिल्यानगर । दि.30 डिसेंबर 2024 । जामखेड येथील प्रसिद्ध कवी, लेखक व रयत शिक्षण संस्थेच्या जामखेड येथील श्री नागेश विद्यालयाचे प्राचार्य आ. य. पवार (वय 78) यांचे सोमवारी सायंकाळी 5.05 वाजता वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. मराठा आंदोलनातील अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रमुख अवधूत पवार यांचे ते वडील होते. रात्री उशिरा जामखेड येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्राचार्य आ.य.पवार यांच्या विज्ञान कविता व काव्यसंग्रह राज्यातील नांदेड, नागपूर, अमरावती व मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात आहेत. तसेच त्यांचा 'धूळपेर' काव्यसंग्रह कर्नाटक वि‌द्यापीठाच्या तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रमाला शंभर गुणासाठी आहे. 'धूळपेर' काव्य संग्रहाला कुलगुरू व ज्येष्ठ साहित्यिक डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांची प्रस्तावना आहे. शेतकरी जीवन, महिला जीवन, सामाजिक, राजकिय व विज्ञान आणि निसर्ग विषयाव‌रील कविता असल्याने हा काव्य संग्रह सामीक्षकांनी गौ‌रविलेला आहे.

पवारांची कविता स्वतंत्र वळणाची व छंदोबद्ध आहेत. जामखेड येथे मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून चांदणझुला कवी संमेलन दरवर्षी भरवले जात होते. या संमेलनात संत तुकाराम पुरस्कार प्रदान केला जात असे यामध्ये मराठी चित्रपटातील प्रसिद्ध गितकार बाबासाहेब सौदागर, प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव, प्रसिद्ध गजलकार तुकाराम पाटील, कथालेखिका प्रतिमा इंगोले, अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार सदानंद देशमुख यांना संत तुकाराम साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, प्रगतशील शेतकरी, सामाजिक, पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान केला जात असे. तसेच विविध कार्यक्रम घेण्यात ते नेहमी आघाडीवर होते. त्यांच्या निधनाने जामखेड पत्रकार संघाने, तसेच शहरातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रध्दांजली वाहीली. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याबद्दल राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेण्यासाठी जामखेड येथे मराठी साहित्य संमेलनाची बैठक प्रसिद्ध लेखक डॉ. विश्वास पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून निवड करण्यात आली होती. याबाबत सोमवारी सायंकाळी सात वाजता बैठक होणार होती व या अजंठ्यावर प्रा. आ. य.पवार यांची सही होती. परंतु अचानक त्यांचे सोमवारी सायंकाळी पाच वाजता निधन झाले यामुळे बैठक स्थगित करण्यात आली.

आ. य. पवार यांचे प्रसिद्ध साहित्य पुढीलप्रमाणे आहेत.
करकुंजाचा थवा (बालसाहित्य), अंब्यावरचा राघु (कथासंग्रह), सिनकाठच्या कविता, ऊनपाऊस, धुळपेर ( काव्यसंग्रह), कर्मयोगी (संपादित) तसेच त्यांच्या या कविता काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post