। जामखेड । दि.15 डिसेंबर 2024 । पाथर्डी व शेवगाव तालुक्यात घरफोडीचे गुन्हे करणारी टोळी गुन्हे शाखेने जेरबंद केली. 3 आरोपी 2 लाख 17 हजाराच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहेत. आरोपीकडून 9 घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोनि दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत थोरात, पोसई अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बबन मखरे, हृदय घोडके, फुरकान शेख, शरद बुधवंत, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे व अरूण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
फिर्यादी सुमन बाबुराव पालवे (रा.घाटशिरस, ता.पाथर्डी) या दि. 25 नोव्हेंबर रोजी कुटुंबियासह लग्नाकरीता बाहेरगावी गेल्या असताना अज्ञात चोरटयांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले.
याबाबत पाथर्डी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा हा विनोद उर्फ सुप्या सक्या भोसले (रा.निपाणी जळगाव, ता.पाथर्डी) व त्याच्या साथीदारांनी केलेला असून ते पाथर्डी शहरामध्ये आहेत, अशी माहिती पथकााला मिळाली. पथकाने संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.
त्यांनी त्यांचे नाव विनोद उर्फ सुप्या सक्या भोसले (वय 25, रा.निपाणी जळगाव, ता.पाथर्डी), सचिन भाऊसाहेब काळे (वय 21, रा.लखमापुरी, ता.शेवगाव) असे सांगितले.आरोपींनी सदरचा गुन्हा हा विकास विठ्ठल भोसले (रा.उमापूर, ता.गेवराई, जि.बीड) (पसार) याच्या मदतीने केला असल्याची माहिती सांगितली.
तसेच गुन्हयातील चोरलेले काही सोन्याचे दागीने हे लक्ष्मीकांत सांडुशेठ मुंडलिक (रा.सोनार गल्ली, बिडकीन, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर) यास विकल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी त्यांचा साथीदार विकास विठ्ठल भोसले याच्यासह मागील दोन- तीन महिन्यात पाथर्डी व शेवगाव तालुक्यात वेगवेगळे घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे दिलेल्या माहितीवरून, पाथर्डी व शेवगाव पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील घरफोडीचे 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत.