। अहिल्यानगर । संगमनेर । दि. 28 डिसेंबर 2024 । भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री आणि पंतप्रधान अशी वेगवेगळी पदे कार्यक्षमपणे भूषवताना डॉ. मनमोहन सिंग यांनी जागतिक मंदीतून भारत देशाला बाहेर काढले. खुली अर्थव्यवस्था, उदारीकरण स्वीकारून देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारे डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक पातळीचे अर्थतज्ज्ञ होते. त्यांच्या निधनाने महान व्यक्तीमत्त्व हरपले असल्याची भावना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी माजी आ.डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, सोमेश्वर दिवटे, नवनाथ आंधळे, प्रा.बाबा खरात, राणी प्रसाद मुंदडा, डॉ. सुचित गांधी, दत्तात्रय आरोटे, सुनंदा दिघे, विलासराव दिघे, राजेंद्र दिघे, शिवाजीराव दिघे, प्रमोद पावसे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, डॉ मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये अर्थमंत्री म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेला वेगळी दिशा दिली. अर्थव्यवस्था, उदारीकरण स्वीकारून देशाची आर्थिक स्थिती मजबूत करताना त्यांनी जागतिक मंदीतून भारताला बाहेर काढले. अत्यंत सुस्वभावी, सुसंस्कृत व उच्चविद्याविभूषित असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी कायम संयमाने काम केले. ते हुशार अर्थतज्ञ, दूरदृष्टी असलेले देशभक्त होते असे ते म्हणाले.