अपघात कमी करण्यासाठी मानवी स्वभावात बदल आवश्यक : नितीन गडकरी


। नवी दिल्ली । दि.14 डिसेंबर 2024 ।  रस्ते दुर्घटनेसंबंधी भारताचा रेकॉर्ड इतका वाईट आहे की, जागतिक परिषदेत आपले तोंड लपवावे लागते. भारतात रस्ते अपघातात मोठी वाढ झाली असून यात बदल घडविण्यासाठी मानवी स्वभावात बदल होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. 
 

लोकसभेत बोलताना त्यांनी उपरोक्त विषयावर परखड मत व्यक्त केले. यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत आणि समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करावे, असे आवाहन केले.

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांची उत्तरं देताना गडकरी म्हणाले की, मी जेव्हा पहिल्यांदा या खात्याचा पदभार स्वीकारला होता. तेव्हा रस्ते अपघातात 50 टक्के घट करण्याचे ध्येय ठेवले होते. पण अपघात कमी होणे दूरच राहिले, तर त्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली. त्यामुळेच मी जेव्हा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होतो, 

तेव्हा रस्ते अपघाताचा विषय निघाल्यानंतर मला तोंड लपवावे लागते. दुर्दैवाने आपल्या देशात दरवर्षी रस्ते अपघाताची संख्या वाढत आहे. 4 लाख 80 हजार 583 अपघात झाले असून मृतांची संख्या 1.5 लाखावरुन सुमारे 1 लाख 78 हजार झाली आहे. त्यात 60 टक्के पीडित हे 18 ते 34 वयोगटातील आहेत, अशी माहितीही गडकरी यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post