मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे : अरूण उंडे

। शिर्डी । दि.26 नोव्हेंबर  2024 । विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून सर्व घटकातील पात्र मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे आणि आपल्या परिचयातील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन नेवासा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अरूण उंडे यांनी केले.

नेवासा तहसील कार्यालयात आयोजित ‘लोकशाही महोत्सवाची दिवाळी’ या उपक्रमात ते बोलत होते. अधिकारी - कर्मचारी पारंपरिक वेशभूषेत या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जागृती करण्यात आली.

उंडे म्हणाले, लोकशाहीचे महत्त्व अबाधीत राहण्यासाठी सर्व नागरिकांनी मतदान करणे गरजेचे आहे. लोकशाहीत प्रत्येक मताला महत्त्व असते. त्यामुळे मतदारांनी निर्भय होऊन जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे.

याप्रसंगी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी विशाल यादव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, मुख्याधिकारी सोनाली म्हात्रे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, निवडणूक नायब तहसीलदार किशोर सानप, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक संदीप गोसावी आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post