जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदार संघात 151 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
जिल्ह्यात 37 लाख 83 हजार 987 मतदार बजावणार मतदानाचा हक्क - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
। अहिल्यानगर । दि. 4 नोव्हेंबर । जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केलेल्या 259 उमेदवारांपैकी 108 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने 151 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
एकूण 37 लाख 83 हजार 987 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, अकोले विधानसभा मतदारसंघात 9, संगमनेर 13, शिर्डी 8, कोपरगाव 12, श्रीरामपूर 16, नेवासा 12, शेवगाव 15, राहुरी 13, पारनेर 12, अहमदनगर शहर 14, श्रीगोंदा 16, तर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकुण 37 लाख 83 हजार 987 मतदारांपैकी 19 लाख 46 हजार 944 पुरुष, 18 लाख 36 हजार 841 महिला मतदार आहेत. 202 तृतीयपंथी मतदार असून सैनिक मतदारांची संख्या 9 हजार 575 आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात सुमारे 54 हजार नवमतदारांची भर पडली असल्याची माहितीही सालीमठ यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात 1 हजार 994 ठिकाणी 3 हजार 763 मतदान केंद्र आणि दोन सहाय्यकारी मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. 1 हजार 500 पेक्षा अधिक मतदार असल्याने शिर्डी मतदारसंघातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय लोणी आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील गजराजनगर (बुर्हाणनगर) जिल्हा परिषद शाळेच्या पूर्व इमारतीत प्रत्येकी एक याप्रमाणे दोन सहाय्यकारी मतदान केंद्र उभारण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.
जिल्ह्यात 19 हजार 960 दिव्यांग व 85 वर्षावरील 55 हजार 801 एवढे मतदार आहेत. यापैकी गृह मतदान सुविधेसाठी 2 हजार 688 मतदारांनी इच्छा प्रदर्शित केली आहे. जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी पुरेशा प्रमाणात ईव्हीएम तसेच मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. जिल्ह्यात मतदान व्यवस्थेचा भाग म्हणून 343 क्षेत्रात जिल्ह्याची विभागणी केली असून प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूणच निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहितीही जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिली.
कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले, निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात ३ हजार ५८० प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच अवैधरित्या वाहतुक करण्यात येणारे मद्य, रोकड आदी मिळून २८ कोटी २६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणुकीशी निगडीत ९ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती ओला यांनी यावेळी दिली.