राणी लंके यांची 18 बुथवरील मतांची पडताळणी करण्याची केली मागणी


राणीताई लंके यांचा ईव्हिएम पडताळणीसाठी अर्ज
 
१८ बुथवरील मतांची पडताळणी करण्याची मागणी

८ लाख ४९ हजार ६०० रूपये शुल्क जमा

। पारनेर । दि.28 नोव्हेंबर 2024 । पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील १८ बुथवरील ईव्हिएम मशिनमधील मतदानाची पडताळणी करण्याची मागणी करणारा अर्ज महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या वतीने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्याकडे गुरूवारी सुपूर्द करण्यात आला. या पडताळणीसाठी ४७ हजार ६०० रूपयांप्रमाणे १८ बुथसाठी आवष्यक असलेले ८ लाख ४९  हजार ६०० रूपये इतके शुल्क लंके यांच्या वतीने शासनाच्या कोषागारात जमा करण्यात आले आहे. 

गेल्या २३ नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी करण्यात आली. पारनेर-नगर मतदारसंघातील मतमोजणी करण्यात आली त्यावेळी महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार काशिनाथ दाते व महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्यात चुरशीची लढत होईल काशिनाथ दाते यांनी या निवडणूकीत अल्पशा मतांनी बाजी मारली. मतमोजणीनंतर राणी लंके समर्थकांकडून ईव्हिएमच मशिनसंदर्भात शंका घेण्यात येत होत्या. 

खा. नीलेश लंके यांनीही दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना ईव्हिएम मशिनवर शंका उपस्थित करत पोष्टल मतदानाचा जो कल असतो तोच कल मतदान यंत्रातील मतांमध्येही असतो असा अनुभव असताना यंदाच्या निवडणूकीत हा कल कसा बदलला गेला असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. या पार्श्वभुमीवर उमेदवार राणी लंके यांच्या वतीने ठराविक मतदान केंद्रावरील मतांची फेर मोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post