भिंगार मध्ये उत्तर रात्री पर्यंत रंगला कलगी तुरा शाहिरी कार्यक्रम

भिंगार मध्ये उत्तर रात्री पर्यंत रंगला कलगी तुरा शाहिरी कार्यक्रम.

महाराष्ट्रातील नामवंत शाहिरांची हजेरी


| अहमदनगर | दि.10 ऑक्टोबर 2024 | भिंगार मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कलगी तुरा कार्यक्रमात शाहीर निजामभाई शेख यांनी 'माये पासून ब्रह्म वेगळं कसं' हे स्पष्ट करणारे कवन सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.

भिंगार कलगीतुरा मित्र मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे नवरात्र महोत्सवानिमित्त सरपण गल्ली येथे आयोजित भव्य कलगीतुरा कार्यक्रमात त्यांनी आपली कलगीतुऱ्याची शाहिरी शानदारपणे पेश केली.

भाऊसाहेब कर्डिले यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमास कलगी-तुरा शाहिरी परंपरेतील ज्येष्ठ कवी बबन दादा चौरे, शाहीर लहू दादा कदम, मेजर पवार, कलगीतुरा शाहिरी परिषदेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव ठाणगे, शाहीर दत्तात्रय चौरे, शांताराम किनकर, भुतकर यांच्यासह राज्यभरातून आलेले शाहीर उपस्थित होते.

'अचाळ अंमळ घननिळा, धावली कळा l तुझ पासून झाले जीव पंचभूती ठाव मांडीला डाव l अंबळ तुरियान जीव जीवाचा सारथी मजा मारती l पहा भारती कवी शोधून l हे भेदिक कवण त्यांनी मोठा जोशात सादर केले.

आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे यांच्या या अविनाश पारक पदाचे विश्लेषण करताना निजामभाई शेख म्हणाले की, या कवणामध्ये ऋषीमुनींनी केलेल्या संवादाचे वर्णन आहे. विविध रंगांच्या झेंड्याना अहंकाराच्या काठ्या जोडल्या की संघर्ष होतो. धागा मात्र एकच असतो. तसेच मातीत हरिनामाचे सोनं ज्यांनी पिकवले. 

त्यांच्या दिंड्या पंढरपूरला जातात. आणि देहरुपी घटाला नऊ इंद्रियाची माळ दशम द्वारात दसरा. ज्यानं या दसऱ्याला हरी नामाचे सोनं लुटलं, त्याची दिवाळी. आणि जो खेळला नाही त्याचा अखंड शिमगा. अशा शब्दात त्यांनी या पदाचे विश्लेषण केले.

वडगाव आमली येथील दत्तात्रय चौरे यांनी सादर केलेल्या गण, गवळणी ने या कलगीतुरा कार्यक्रमास प्रारंभ झाला. शांताराम किनकर यांनी अहो दोन दिवसाची जवानी जाईल सरून l मानव जन्म येणार नाही फिरून l हा छंद सादर केला. त्याचबरोबर राजूभाऊ निमसे व पाराजी पानसंबळ कलगीवाले, खारे कर्जूने, शाहीर मेजर पवार, शाहीर लहू दादा कदम, शाहीर शिवाजीराव ठाणगे, शाहीर भुतकर यांच्यासह अनेक कलगीतुरा शाहिरांनी आपली कला सादर केली.

कलगीतुऱ्याचे युवा शाहीर सागर चौरे या कॉम्प्युटर इंजिनियर असलेल्या तरुण शाहिराने शिष्याविना गुरुरायाला वाट दावा l जुन्या गावाला मायेच्या जाळ्यामध्ये जीव पडला अडकुनी l घाण्याचा बैल फिरतो डोळ्याला झापड लावुनी l फेरे फिरून जीव दमला l हा छंद सादर केला.

शाहीर बबन दादा चौरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की भिंगार येथे पलंग पालखीची पहिली भेट झाली. तेव्हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तेव्हापासून भिंगारच्या सरपण गल्लीतील या कलगीतुरा शाहिरी परंपरेला आज जवळपास २५० वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या २५० वर्षांमध्ये या ठिकाणी अनेक शाहिरांनी उपस्थिती लावून आपली कला सादर केली. त्यामुळे या फडाला एक अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. 

म्हणजे कलगीतुऱ्याचा फड कलगी तत्व कलगी म्हणजे काय ?कलगीतुऱ्याचा उगम कसा झाला ? देहाची भूमिका कलगीने कशी निभावली ? आत्मतत्त्वाची महती त्याने गायची असते. प्रकृती म्हणजे शरीर, ज्ञान आणि क्रियाच्या संगमाने जगाची उत्पत्ती झाली. कलगी तुर्याची शाहिरी परंपरा व भेदिक ही संकल्पना सांस्कृतिक कार्य संचालनालयापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी मिळून केले पाहिजे. त्याचबरोबर कलगीतुरा शाहिरीला राजाश्रय मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी लोकप्रतिनिधींकडे केले.

भिंगारच्या कलगीतुरा शाहिरीला २५० वर्षांची दीर्घ परंपरा आहे. केवळ ढोलकी, तुनतुने आणि खंजिरी या पारंपारिक लोकवाद्यांचा वापर करून कलगीतुऱ्याचा सामना रंगतो. संध्याकाळी ७ वाजता सुरू झालेला कलगीतुऱ्याचा हा कार्यक्रम पहाटे ५ वाजेपर्यंत चालतो. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सुप्रसिद्ध शाहीर हजेरी लावतात. भिंगारच्या कार्यक्रमाला हजेरी लावणे हे कलगीतुऱ्यांच्या शाहिरांमध्ये प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते.

नगर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने या दुर्मिळ होत चाललेल्या लोककलेला राजाश्रय द्यावा व आगामी काळामध्ये नगर जिल्ह्यामध्ये कलगीतुरा शाहिरी संमेलन आयोजित करावे अशी मागणी लोककला अभ्यासक भगवान राऊत यांनी या व्यासपीठावरून केली.

👉नवनागापूर येथील श्री रेणुका माता मंदिरात नवरात्रनिमित्त भाविकांची मांदियाळी

👉‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ पुढील पाच वर्ष चालू राहील : उपमुख्यमंत्री 

👉अहिल्यानगर नामकरणातून नगरच्या भूमीचा सन्मान


Post a Comment

Previous Post Next Post