संभाजी ब्रिगेड स्वबळावर 50 जागा लढणार : प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे


। छत्रपती संभाजीनगर । दि.23 ऑक्टोबर । राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने संभाजी ब्रिगेडला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे ही युती आता तुटली असून राज्यात संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार आहे. राज्यात 50 पेक्षा अधिक उमेदवार देणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, गंगाधर बनबरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दोन वर्षापूर्वी शिवसेने बरोबर संभाजी ब्रिगेडची युती झाली होती. लोकसभा निवडणुकीत एकही जागा न घेता संभाजी ब्रिगेडने शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचा प्रचार केला. महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांनी विधानसभेला संभाजी ब्रिगेडला त्यांच्या कोट्यातून किमान चार ते पाच जागा देण्याचे आश्वासन दिले होते.

परंतु विधानसभेच्या जागा वाटपात आम्हाला सन्मानपूर्वक स्थान व आश्वासनानुसार जगा न दिल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. शिवसेना (उबाठा)  बरोबरची युती तोडून महाविकास आघाडीतून आम्ही बाहेर पडत आहोत. जात, धर्म, फॅसिस्ट शक्तींना संभाजी ब्रिगेडचा नेहमीच विरोध राहिला असून तो कायम राहील.

संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही लोकांचे प्रश्न, महामानवांचे विचार घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहोत. सुमारे 50 जागावर आमचे उमेदवार अर्ज भरणार आहेत. महायुतीची सनातन विषमता व आघाडीचे नकली पुरोगामीत्व या विरोधात समाजमत तयार करण्याची गरज असल्याचेही डॉ.शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.    

Post a Comment

Previous Post Next Post