देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय : राष्ट्रपती

श्री वारणा महिला सहकारी उद्योग समूह सुवर्ण सोहळा, वारणा विद्यापीठाचे उद्घाटन

| कोल्हापूर | दि. 04 सप्टेंबर | 2024 |  देशाच्या आर्थिक विकासात खाजगी उद्योग आणि व्यापार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्याचप्रमाणे देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. वारणानगर येथे आयोजित श्री वारणा महिला सहकारी उद्योग समूह सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठ उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ.विनय कोरे, वारणा बँकेचे संचालक निपुन कोरे, सावित्री महिला सहकारी संस्थेच्या संचालक शुभलक्ष्मी कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दारिद्र्य निर्मूलन, अन्न सुरक्षा आणि नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन यामध्ये सहकार संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, काळानुरूप सहकार संस्थांनीही स्वत:ला बदलण्याची गरज असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थापनाला व्यावसायिक बनवले पाहिजे. वारणा समूहाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी आनंद होत असल्याचे सांगून वारणा उद्योगाच्या सर्वांगीण विकासात योगदान दिल्याबद्दल उपस्थित महिलांचे कौतुक केले.

सहकारी संस्थांमध्ये त्यांच्या सभासदांचे हित सर्वोच्च असले पाहिजे. कोणतीही सहकारी संस्था कुणाच्या वैयक्तिक स्वार्थाचे आणि फायद्याचे साधन बनू नये, अन्यथा सहकाराचा उद्देशच नष्ट होईल, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. सहकारात खरे सहकार्य हवे, व्यक्तीहित नको असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

Post a Comment

Previous Post Next Post