कांद्याच्या माळा घालून महाविकास आघाडीच्या खासदारांचे संसदेसमोर आंदोलन

खा. नीलेश लंके यांचा आंदोलनात सहभाग

कांद्याच्या माळा घालून महाविकास आघाडीच्या खासदारांचे संसदेसमोर आंदोलन

| अहमदनगर | दि.08 ऑगस्ट 2024 | लोकसभा निवडणुकीत कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याप्रश्नी आज महाविकास आघाडीच्या खासदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेसमोर आंदोलन केले. या आंदोलनात नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार नीलेश लंके सहभागी झाले होते.

कांद्यावर असलेली निर्यात बंदी उठवावी  तसेच नाफेडकडून कांदा खरेदी करण्यात यावा. त्याचबरोबर कांद्याला 35 रुपये किलोप्रमाणे भाव मिळावा. शेतकर्यांच्या शेतीमालाला एमएसपी मिळावी, अशी मागणी करण्यात आली. आज महाविकास आघाडीच्यावतीने संसदेच्या गेटसमोर हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व खा. सुप्रिया सुळे यांनी केले. या आंदोलनात खा. नीलेश लंके, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, नाशिकचे शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी सहभागी झाले होते. या आंदोलनात इंडिया आघाडीच्या इतर खासदारांनी ही सहभाग घेत पाठिंबा दिला.

 इंडिया आघाडीचे घटकपक्ष असलेल्या टी डी पी, समाजवादी पार्टीच्या खासदारांनीही या आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांच्या या जिव्हाळयाच्या प्रश्‍नावर जोरदार घोषणाबाजी केली.  

शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी विरोधी सरकारचे करायचे काय ,  खाली डोकं  वर पाय, कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, किसान विरोधी मोदी सरकार शरम करो, शरम करो, किसान विरोधी मोदी सरकार हाय हाय, कीसान की फसल को एमएसपी दो, किसानपर अन्याय बंद करो अशी आक्रमक घोषणाबाजी करत इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसर दणाणून सोडला होता.

Post a Comment

Previous Post Next Post