लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर

| मुंबई | दि.14 ऑगस्ट 2024|  सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर मंगळवारी करण्यात आले. सन २०२४ च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे.

यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लो स्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांची व बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने या पुरस्कारांची शिफारस केली आहे. विविध क्षेत्रात योगदान देणार्‍या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेला आहे.

या बरोबरच शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दलचा पं. भीमसेन जोशी पुरस्कार आरती अंकलीकर टिकेकर यांना तर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार शुभदा दादरकर यांना जाहीर झाला असून रंगभूमीवरील कार्यासाठी प्रकाश बुद्धीसागर यांनाही पुरस्कार जाहीर झाला. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार शशिकला झुंबर सुक्रे यांना जाहीर झाला आहे.

या बरोबरच विशाखा सुभेदार, डॉ. विकाश कशाळकर, सुदेश भोसले, लोककलाकार अभिमन्यू धर्माजी सावदेकर, शाहीर राजेंद्र कांबळे, सोनिया परचुरे, रोहिणी हट्टंगडी, कितर्नकार संजयनाना धोंडगे, वाद्यसंगीतासाठी पांडुरंग मुखडे, कैलास मारुती सावंत तर आदिवासी कलेसाठी शिवराम शंकर धुटे यांनाही पुरस्कार घोषित झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post