विळद परिसरात पर्यटकावर दरोडा टाकुन लुटणारी टोळी जेरबंद

 

| अहमदनगर | दि.09 ऑगस्ट 2024| विळद (ता. नगर) परिसरात पर्यटकास लुटणार्‍या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. सुरेश रणजीत निकम (वय 30), विलास संजय बर्डे (वय 22), रोहित संदीप शिंदे (वय 19 सर्व रा. कात्रड, ता. राहुरी), ज्ञानेश्‍वर भानुदास बर्डे (वय 21, मूळ रा. कोंढवड, ता. राहुरी, हल्ली रा. बोल्हेगाव, ता. नगर), शांताराम भानुदास काळकुंड (वय 19, रा. निंबळक, ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत थोरात, पोहेकॉ गणेश भिंगारदे, संतोष लोंढे, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, फुरकान शेख, रविंद्र घुगांसे, आकाश काळे, मयूर गायकवाड, किशोर शिरसाठ, रोहित येमुल, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड, चंद्रकांत कुसळकर,अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

दि. 3 ऑगस्ट रोजी वैभव उत्तम सहजराव (वय 21, रा. जांब, जि. परभणी, हल्ली रा. पंचवटी नगर, भिस्तबाग चौक, सावेडी) हे विळद परिसरातील गवळीवाडा वॉटर फॉल येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी अनोळखी 5 जणांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल, चांदीची चेन, अंगठी व रोख रक्कम असा 6 हजार 900 रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे व गुप्त बातमीदारामार्फत एमआयडीसी, बेल्हेगाव, विळद व राहुरी परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली. त्यावेळी पोनि आहेर यांना माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा सुरेश रणजीत निकम व विलास बर्डे (दोन्ही रा. कात्रड, ता. राहुरी) यांनी त्यांचे इतर 3 साथीदारांसह केला आहे. ते कात्रड गावातील स्मशानभूमीजवळ बसलेले आहेत. त्यांच्या सूचनेवरून पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता, काही व्यक्ती एका झाडाखाली गप्पा मारत बसलेले दिसले. पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post