एलसीबीची कारवाई : शेतामधून दहा लाखांचे डाळिंग चोरणारे जेरबंद

शेतातून दहा लाखांचे डाळिंब चोरणार्‍या टोळीतील तिघे जेरबंद

I एलसीबीची राहुरीत कारवाई । आणखी सात साथीदारांचा शोध सुरू

। अहमदनगर । दि. 20 ऑगस्ट । शेतकर्‍याच्या शेतातील 10 लाखाचे डाळिंब चोरणार्‍या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. आदिनाथ गोविंद माळी (वय 25, रा. धानोरा झरेकाठी, ता. संगमनेर), अमोल नामदेव पवार (वय 24, रा. म्हैसगांव, ता. राहुरी) व आनंद संजय पवार (वय 19, रा. चिंचोली फाटा, ता. राहुरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, त्यांचे आणखी काही साथीदार अजून फरार आहेत.

माहिती अशी की, दि.29 जुलै 2024 रोजी फिर्यादी विजय शिवाजी मापारी (वय 36, रा. मापारवाडी लोणी खुर्द ता. राहाता) यांच्या तीन एकर शेतातील अंदाजे चौदा टन वजनाचे भगवा जातीचे पूर्ण वाढ झालेले अंदाजे 14 टन वजनाचे डाळिंब अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात दहा लाख रुपयांचा ऐवज चोरल्याचा गुन्हा दाखल आहे.

एलसीबीचे पथक लोणी, राहाता व शिर्डी परिसरात तपास करीत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, हा गुन्हा आदिनाथ माळी याने साथीदारांसह केला असून तो त्याच्या दोन साथीदारांसह चिंचोली फाटा (ता. राहुरी) येथे चहा टपरीवर बसलेला आहे, त्यानुसार पथकाने चिंचोली फाटा येथे जाऊन तीन संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी अविनाश सुभाष माळी, अजय जालिंदर माळी, शंकर पवार, (तिघे रा. चिंचोली फाटा, ता. राहुरी), विकास काळे, पवन मधे व आकाश काळे (तिघे रा. म्हैसगांव, ता. राहुरी) व अवि गवळी (रा. गोदावरी वसाहत, ता. राहुरी) या साथीदारांसह मापारवाडीतील शेतकर्‍याच्या शेतातील डाळिंब चोरल्याची कबुली दिली.

आरोपींना लोणी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोकॉ प्रमोद जाधव, सागर ससाणे, आकाश काळे, मयुर गायकवाड, फुरकान शेख व चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post