छत्रपती संभाजीनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजय पाथ्रीकर
G1 ग्रुप तर्फे नागरी सत्कार संपन्न
। छत्रपती संभाजीनगर । दि.03 मार्च । छत्रपती संभाजीनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनची 2023 ते 2028 करीता कार्यकारिणीची पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये बिनविरोध नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. या निवडणुकी मध्ये क्रीडा क्षेत्राची मोठी परंपरा असलेल्या अजय (मुन्नाभाऊ) अण्णासाहेब पाथ्रीकर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर सचिव पदी डॉ. माणिक राठोड व उपाध्यक्ष म्हणून नंदकुमार घोडेले, रमेश पवार व संभाजी आतकरे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच खजिनदार म्हणून विजय वानखेडे यांची निवड झाली आहे.
या यशाबद्दल अजय पाथ्रीकर यांचा G1 ग्रुपच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना पाथ्रीकर म्हणाले कबड्डी हा कष्टकऱ्यांचा व जास्तीत जास्त ग्रामीण भागातील सुदृढ तरुणांचा खेळ आहे. या क्षेत्रात जास्तीत जास्त होतकरू तरुण पुढे यावेत याकरिता मी पुढील पाच वर्ष कार्य करत राहील. कबड्डी खेळाला जास्तीत जास्त प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहील व सर्वसामान्य प्रामाणिक खेळाडूंना न्याय मिळवून देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन.
या निवडीबद्दल दत्ताभाऊ पाथ्रीकर, राजू शिंदे व इतर प्रतिष्ठित नागरिकांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी G1 ग्रुपचे अध्यक्ष रामकृष्ण गोसावी, प्रा. डॉ. बाळासाहेब पवार, एकनाथ मगर, दिवाकर जाधव, ॲड. सुधीर रक्षाळे, श्रीखंडे, पाटणेकर,पतंगे, क्रीडाशिक्षक दत्तात्रय नवगिरे व G1 ग्रुपचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.