वनवे टाळण्यासाठी ग्रामस्थांनी काळजी घ्यावी : उपवनसंरक्षक सुवर्णा माने

। अहमदनगर  । दि.04 मार्च । जिल्ह्यामध्ये या वर्षात पाऊस जास्त असल्यामुळे जंगलामध्ये गवत खुप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या गवतामुळे जंगलामध्ये वनवा लागण्याच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. नैसर्गिक साधन संपत्ती, बहुमोल वनसंपत्ती नष्ट होण्याबरोबरच जैवविविधतेचा ऱ्हास  होतो. वनव्यात किटक नष्ट झाल्याने परागभवनाची प्रक्रीया मंदावुन त्याचा परिणाम उत्पादन वाढीवर होतो.

 तसेच वनव्यामुळे उघडी पडलेली जमीन उन्हाळ्यात तापते आणि पावसाळ्यात त्या जमिनीची धूप होऊन जमीन नापीक होते. त्यामुळे ग्रामस्थांनी हे वनवे टाळण्यासाठी खालील प्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

आगीपासून जंगल संपत्तीचे रक्षण करावे व निसर्गाचा -हास टाळण्यास मदत करावी. वनवा लागू नये म्हणून ट्रेकर्स, पर्यटकांमध्ये जनजागृती करणे, ग्रामसभेमध्ये वनव्यापासूनचे धोके नागरीकांना समजावून सांगावेत, जंगलक्षेत्र व रोपवण क्षेत्रालगत असणा-या शेतक-यांनी शेतात बांध पेटवताना जवळच्या वन अधिका-यांना कळविल्याशिवाय आग पेटवु नये.

 शेतात आग पेटविली तर ती विझविल्याशिवाय क्षेत्र सोडून शेतक-यांनी कुठेही जाऊ नये, जंगलक्षेत्रातून गेलेले रस्ते व धार्मिक ठिकाणी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.  वनवा लावू नका आणि कोणी लावत असेल तर लावू देऊ नका. ऐकत नसेल तर त्यासंबंधिची माहिती १९२६ या टोल फ्री नंबरवर द्यावी.

भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ अन्वये राखीव वनात आग प्रतिबंधित केलेली आहे. या गुन्ह्यास १ वर्षापर्यंत कारावास किंवा ५००० रुपया पर्यंत दंड किंवा दोन्ही होऊ शकते, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post