। मुंबई । दि.07 फेब्रुवारी 2023 । मंगेशकर कुटुंबियांनी संगीताची सेवा करून सांस्कृतिक विश्व समृद्ध केले. या कुटुंबातील भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे अलौकिक देणं आहे. त्यांच्या स्मृतीनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
आमदार ॲड. आशिष शेलार यांच्यातर्फे आज सायंकाळी षण्मुखानंद सभागृहात ‘लतांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, खासदार तथा अभिनेत्री हेमामालिनी, संगीतकार श्री. प्यारेलाल शर्मा, सौ. शर्मा, श्री. आनंदजी, अभिनेत्री मौसमी चटर्जी, रीना रॉय, पद्ममिनी कोल्हापुरे, काजोल, रविना टंडन, गायक सुरेश वाडकर, गायिका साधना सरगम, बेला शेंडे, आदिनाथ मंगेशकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयामुळे महाराष्ट्राचा नावलौकिक वाढणार आहे. त्यामुळे या संगीत महाविद्यालयास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. लता मंगेशकर यांच्या आवाजाने भौगोलिक सीमा ओलांडून नागरिकांचे भावविश्व व्यापले. त्यांचा आवाज प्रत्येक घरात लहानापासून ते मोठ्यापर्यंत ऐकला जातो. गायन आणि संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्यापासून नवोदित गायक, कलावंतांना प्रेरणा मिळाली. मीरा भाईंदर येथे लता मंगेशकर यांच्या नावाने एक हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह उभारण्यात येत आहे, त्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी आमदार ॲड. आशिष शेलार, आदिनाथ मंगेशकर यांच्यासह अभिनेत्री आशा पारेख, खासदार हेमामालिनी, संगीतकार श्री. प्यारेलाल, अभिनेत्री मोसमी चटर्जी, रिना रॉय, रविना टंडन, काजोल यांनी लता मंगेशकर यांच्या विविध आठवणी सांगितल्या.
यावेळी गायिका साधना सरगम, बेला शेंडे, संपदा गोस्वामी, शरयू दाते, निरुपमा डे आदींनी लता मंगेशकर यांची अजरामर गीते सादर केली. यावेळी लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.