। अहमदनगर । दि.26 फेब्रुवारी । अहमदनगर महापालिका घनकचरा विभागाच्यावतीने शहरातील कचरा संकलन तसेच घरोघरी जाऊन कचर्याचे संकलन घंटागाडीद्वारे केले जात आहे. घंटागाडी आता शहरामध्ये ठरलेल्या मार्गाप्रमाणे व दिलेल्या वेळेत जाण्यासाठी या गाड्यांना जीपीएस सिस्टीम लावली जाणार आहे, असे मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सांगितले.
अहमदनगर महापालिका घनकचरा विभागाची आयुक्त डॉ. जावळे यांनी बैठक घेतली. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, घनकचरा विभाग प्रमुख किशोर देशमुख व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
घंटागाड्यांच्या माध्यमातून शंभर टक्के कचरा संकलन केले जाईल. जर या कामामध्ये कामचुकारपणा केल्यास ठेकेदाराला दंड लावण्यात येणार आहे. घनकचरा विभागातील कामाबाबत पारदर्शकता आणण्यासाठी जीपीएस सिस्टीमची माहिती अधिकार, कर्मचारी व ठेकेदारांना दिली आहे. या कामासाठी लवकरच खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहितीही डॉ. जावळे यांनी दिली.
दरम्यान, शहरामध्ये घंटागाड्या नियमित व वेळेवर घरोघरी जाण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. आपले शहर शंभर टक्के कचराकुंडी मुक्त आहे. कोणत्याही नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता घंटागाडीमध्ये ओला व सुका कचरा वेगळा टाकावा, असे आवाहन घनकचरा विभाग प्रमुख किशोर देशमुख यांनी केले आहे.