। मुंबई । दि.01 फेब्रुवारी 2023 । राज्यातील वाढते नागरिकरण व औद्योगिकरण लक्षात घेता, अग्निसुरक्षा विषयक बाबींसाठी असलेल्या महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, 2006 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत खालील सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कार पार्किंगची समस्या लक्षात घेता, स्वयंचलित पार्किंगची उंची 45 मीटर वरुन 100 मीटर पर्यंत त्याचबरोबर शैक्षणिक इमारतींची उंची 30 मीटर वरुन 45 मीटर पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
आगीच्या संभाव्य धोक्यांचे मूल्यमापन करुन, उपलब्ध अग्निप्रतिबंधक उपाययोजना यांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन करण्यात येईल. गोदामे व शितगृहे यांची उंची 15 मीटर वरुन 24 मीटर पर्यंत वाढविण्यात येणार आहे. अग्निशमन अधिनियमातील अनुसूची-1 मध्ये विविध प्रकारच्या इमारतींसाठी किमान अग्निशमन उपाययोजना या राष्ट्रीय बांधकाम संहिता, 2016 प्रमाणे सुधारीत करण्याचा निर्णय यावेळी झाला.
अग्निशमन शुल्कात बदल करुन ते बांधकामाच्या रेडी रेकनरवर आधारीत करुन, एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) प्रमाणे लागू होणारे अग्निशमन पायाभूत शुल्क एकत्रित करुन अनुसूची-2 मध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.