राजकारणातील सच्चा समाजकारणी : माजी आ.दादाभाऊ कळमकर

राजकारणील सच्चा समाजकारणी : माजी आ.दादाभाऊ कळमकर


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते, माजी आ. दादाभाऊ कळमकर यांचा ७८ वा वाढदिवस गुरूवारी (दि.5 जानेवारी) साजरा होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नगर जिल्ह्यातील एकनिष्ठ नेते म्हणून कळमकर ओळखले जातात. समाजकारण, राजकारणातील प्रदीर्घ वाटचालीत सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याची त्यांचे कौशल्य सर्वांनाच परिचित आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख.....

पारनेर तालुक्यातील छोट्याशा गावात अतिशय साधारण शेतकरी कुटुंबात दादा कळमकर यांचा जन्म झाला. सामान्य शेतकरी कुटुंबात जशी आर्थिक ओढाताण असते तशीच त्यांच्याही कुटुंबात होती. पण या परिस्थितीनेच त्यांना घडवले. संघर्ष करण्यास शिकवले.  दादा
शिक्षण व व्यवसायानिमित्त नगरला आले व कायमचे नगरकर झाले. स्वत: अतिशय गरीबी पाहिलेली असल्याने सुरुवातीपासूनच सर्वसामान्य, गोरगरीबांकडे त्यांचा ओढा होता. यातूनच त्यांनी नगरमध्ये आपला झोपडी कॅन्टीनचा व्यवसाय सांभाळतानाच समाजकारणातही उडी घेतली. पुढे त्यांच्यातील नेतृत्त्वगुण त्यांना राजकारणात घेवून गेले. दिग्गज उमेदवाराचा पराभव करून त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली व पुढे अनेक वर्षे त्यांनी नगरपालिकेत अभ्यासू वृत्तीने काम करीत अनेक विकासकामे मार्गी लावली. तत्कालीन नगरपालिकेत अभ्यासू, संयमी आणि वेळ प्रसंगी जनहिताच्या प्रश्नांवर तितकेच आक्रमक नगरसेवक म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली.   


याच काळात त्यांचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संपर्क आला व पुढे त्यांचे राजकारण हे शरद पवार यांच्या अवतीभोवतीच राहिले. पवार साहेब जिथे तिथे दादा असे समीकरणच रूढ झाले.  1985 मध्ये त्यांना नगर शहरातून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी ही निवडणूक लढवत इतिहास घडवला. तत्कालीन बड्या मंत्र्यांचा पराभव करीत त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी, आर्थिक ताकद नसताना केवळ सर्वसामान्यांच्या पाठबळावर दादांनी ही किमया साधली.

नव्वदच्या दशकात नगरच्या राजकारणाचा बाज बदलला. परंतु, पवार साहेबांनी सलग पाच वेळा दादांनाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर तब्बल बारा वर्षे त्यांनी जिल्हाध्यक्षपद सांभाळून पक्ष संघटना मजबूत करण्यात मोठे योगदान दिले. जिल्ह्यातील प्रस्थापित व दिग्गज पुढाऱ्यांच्या मांदियाळीत दादा सहज रमले. पक्षनिष्ठा काय असते, वैचारिक बैठक कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे दादा. राजकारणात असले तरी त्यातील चुकीच्या प्रवृत्तींपासून त्यांनी कायम अंतर राखले. युवकांना ते कायम व्यसनमुक्त, उद्यमशील राहण्याचा सल्ला देतात. पुतणे अभिषेक कळमकर यांना राजकारणाचे बाळकडू देताना संस्कार जपून समाजकार्य करण्याची प्रेरणा दिली.

दादांचा स्वभाव अतिशय चांगला असून कधीही कोणाला दुखावण्याचे काम त्यांनी केले नाही. आपल्याकडून कोणाला कधी त्रास होईल असे कृत्य त्यांनी कधीच केले नाही. आज सक्रीय राजकारणापासून ते थोडे दूरच आहेत. पण त्यांनी जोडलेली माणसं कायम त्यांच्या कडे सल्ला घेण्यासाठी जातात. ते सुद्धा आपुलकीने विचारपूस करून कामं मार्गी लावतात. दादांचा व्यासंग खूप मोठा आहे. पुस्तके वाचण्याची आवड त्यांनी कायम जोपासली आहे.  राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही तर या माध्यमातून समाजाचे हित साधणे महत्वाचे आहे असे ते मानतात. त्यामुळेच आजच्या पिढीसाठी ते खऱ्या अर्थाने आदर्श ठरतात.


दादांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, याच आजच्यानिमित्त शुभेच्छा!

 
-प्रा.अर्जुनराव तात्याभाऊ पोकळे सर
जनरल बॉडी सदस्य
रयत शिक्षण संस्था

Post a Comment

Previous Post Next Post