। अहमदनगर । । दि.03 जानेवारी 2023 । नगर शहर व उपनगरात मंगळसूत्र ओरबाडण्यासह चोर्या, घरफोड्या, दरोड्याच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांचा पोलिसांनी गांभीर्याने तपास करीत नाहीत, असा दावा निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष राजूभाऊ लोटके यांनी केला आहे व तसे निवेदन त्यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दिले आहे. शहरात पोलिसांनी गस्त सुरू ठेवून सराईत गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात त्यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगर शहर, केडगाव, सावेडी, नागापूर, बोल्हेगाव, तपोवन रोड, मध्यवर्ती शहर, नालेगाव, कल्याण रोड, भिंगार परिसरात चोर्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरात मंगळसूत्र चोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मागील आठवडाभरात तर दररोज धूमस्टाईल मंगळसूत्र चोर्या होत आहेत. त्यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे.
सध्याच्या महागाईच्या काळात नागरिक काटकसर करून व कष्ट करून पैशांची बचत करतात. आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी थोडे- थोडे करून सोन्याचे दागिने साठवतात. अशात चोर्या व घरफोड्यांमध्ये रोख रक्कम व सोने चोरीला जाते. वर्षानुवर्षे तपास लागत नाही. सामान्य, मध्यमवर्गीय, नोकरदार व्यक्तींना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
दररोज या घटना घडत असताना त्याचा तपास करून चोरांचा बंदोबस्त करण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे, असे म्हणणेही त्यांनी निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे. नुकतेच कल्याण रोड परिसरात चार ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सोने व रोख रक्कम चोरून नेली.
शहरात बाहेरील जिल्ह्यातील व परराज्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत की काय, असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे. पोलिस प्रशासन या घटना रोखण्यासाठी व गुन्ह्याच्या तपासासाठी ठोस भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे. पोलिसांनी शहरात गस्त सुरू ठेवावी तसेच सराईत गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी सुनील आकसाळ, गजेंद्र आकसाळ, रुपेश धुमाळ, धनंजय आरडे, दीपक आगळे, आकाश मिसाळ, युवराज गुंजाळ, महेश मोहारे, मयुरेश शेरकर, पंकज सायंबर आदी उपस्थित होते.
-------
🎯 दारु पिऊन वाहन चालविणे भोवले; चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
Tags:
Ahmednagar