। अहमदनगर । दि.08 डिसेंबर । मटका-जुगार चालवणार्या तिघांना पोलिसांनी पकडले कल्याण मटका जुगार चालविणार्या तिघांवर तोफखाना व कोतवाली पोलिसांनी कारवाई केली. संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान सुमारे पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे बस स्थानकाच्या भिंतीच्या आडोशाला विनोद बबनराव शेटे (वय 52, रा. वंजार गल्ली, रामचंद्र खुंट, नगर) हा लोकांना कागदावर अंक लिहून ते त्यांना देवून पैसे घेवून कल्याण मटका जुगार खेळताना व खेळविताना मिळून आला. त्याच्याविरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अंमलदार सोमनाथ राऊत यांनी फिर्याद दिली आहे.
माळीवाडा बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूला भिंतीच्या आडोशाला मंगेश हिरामण भोसले (वय 36, रा. जहागीरदार चाळ, बुरूडगाव रोड) हा लोकांना कागदावर अंक लिहून ते त्यांना देवून पैसे घेताना मिळून आला. पोलिस अंमलदार अमाले गाढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोसलेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
तोफखाना पोलिसांनी घासगल्लीमध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर कारवाई केली. तेथे आसिफ कादर शेख (वय 48, रा. पिंजार गल्ली) हा मटका घेत होता. त्याच्याविरुध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार चेतन मोहिते यांनी फिर्याद दिली आहे.