। अहमदनगर । दि.08 डिसेंबर । रात्रीच्या वेळी डिझेल चोरी करणार्या दोघांना पकडून पाच हजार लीटर चोरीचे डिझेल, ट्रॅक्टर-टँकर असा 10 लाख 62 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुधवारी रात्री नगर तालुका पोलिसांनी अकोळनेर (ता. नगर) ऑइल डेपोच्या शेजारी ही कारवाई केली.
आदेश बाळासाहेब शेळके (वय 22) व तुषार रोहीदास जाधव (वय 32, दोघे रा. अकोळनेर) अशी चोरट्यांची नावे असून त्यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी रात्री 11.50 वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना माहिती मिळाली की,
आदेश बाळासाहेब शेळके हा त्याचे ट्रॅक्टरला टँकर जोडून घेवून अकोळनेर ऑईल डेपो शेजारील रेल्वे ट्रॅकवर येथे उभ्या रेल्वे टँकरमधून डिझेल चोरी करीत आहे. निरीक्षक राजेंद्र सानप यांनी लगेच अंमलदार जंबे, दहिफळे, बोराडे, इथापे यांना सोबत घेऊन अकोळनेर-सारोळा कासार जाणार्या रोडवर सापळा लावला.
समोरून एक ट्रॅक्टर येताना दिसताच पथकाने ट्रॅक्टरला थांबण्याचा इशारा केला तेव्हा ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर थांबविला. तेव्हा चालका शेजारी आणखी एक इमस बसलेला होता. चालकास व त्याचे साथीदारास खाली उतरण्यास सांगुन त्यास नाव गाव विचारले असता चालकाने त्याचे नाव आदेश बाळासाहेब शेळके व त्याच्या साथिदाराने तुषार रोहीदास जाधव असे सांगितले.
अकोळनेर ऑइल डेपोचे शेजारी असणारे रेल्वे ट्रॅक वरील उभ्या रेल्वे टँकरचा वॉल खोलून त्या व्दारे पाईपने ट्रॅक्टरचे टँकरमध्ये डिझेल भरून आणले आहे, अशी कबूली त्या दोघांनी दिली. त्यांच्याकडून सहा लाखांचा ट्रॅक्टर, चार लाख 62 हजार 500 रूपये किमंतीचे पाच हजार लीटर डिझेल असा 10 लाख 62 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
---------
⏰ हात उसने पैसे न दिल्याने मित्रावर टोकदार वस्तुने मारहाण