। अहमदनगर । दि.21 डिसेंबर । जन्म मृत्यू नोंदणी व दाखल्यांचे काम सध्या एकाच ठिकाणी सुरू आहे. या कामाचे विकेंद्रीकरण करून शहरातील नागरिकांना जन्म व मृत्यू नोंदणी व दाखले चारही प्रभाग कार्यालयांमार्फत वितरित करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी घेतला आहे.
आयुक्तांच्या आदेशानुसार आरोग्य विभागाकडून तांत्रिक पूर्तता होऊनही प्रभाग कार्यालयांकडून जन्म व मृत्यू नोंदणी व दाखले देण्याचे काम सुरू करण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे नागरिकांना उपनगरातून मध्य शहरात हेलपाटे मारावे लागत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या महानगरपालिका कार्यालयातील जन्म व मृत्यू नोंदणी विभागामार्फत जन्माची व मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे. दाखल्यांचे वितरणही याच कार्यालयातून केले जाते. दिवसेंदिवस शहराचा विस्तार वाढत असल्याने नवीन उपनगरांमध्ये वसाहती वाढत आहेत.
जन्म व मृत्यूची नोंदणी व दाखल्यांचे काम एकाच ठिकाणाहून सुरू असल्याने उपनगर परिसरातील नागरिकांना दाखल्यांसाठी जुन्या पालिकेत यावे लागते. नागरिकांची होणारी ही ससेहोलपट थांबविण्यासाठी मनपा आयुक्त जावळे यांनी चारही प्रभाग कार्यालयांमार्फत जन्म व मृत्यूची नोंदणी तसेच दाखल्यांचे वितरण सुरू करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.
चारही प्रभाग कार्यालयांमध्ये यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करून त्यांच्यामार्फत हे काम केले जाणार आहे. सद्यस्थितीत दाखल्यावर जन्म व मृत्यू नोंदणी उपनिबंधक म्हणून डॉ. बोरगे यांना अधिकार आहेत. मात्र, चारही प्रभाग कार्यालयांमार्फत कामकाज सुरू झाल्यानंतर चारही ठिकाणी स्वतंत्र उपनिबंधक नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे. आरोग्य विभागाच्या जन्म व मृत्यू मुख्य निबंधकांकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
-------
💥 गुटखा प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू
💥 फोटो स्टुडीओ फोडून केला ऐवज लंपास
💥 आम्हाला गाडी आडवी का लावली म्हणत मारहाण