समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्याच्या शिर्डी इंटरचेंज येथील थेट प्रक्षेपण कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जनतेच्या मनाला जोडणारा विकासाचा महामार्ग : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
। अहमदनगर/शिर्डी । दि.12 डिसेंबर । हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या वाहतूक व दळणवळण सेवेचे लोकार्पण नागपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी करण्यात आले. नागपूर येथील मुख्य सोहळ्याचे शिर्डी इंटरचेंज येथे थेट दृकश्राव्य प्रक्षेपण करण्यात आले. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रक्षेपण कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जनतेच्या मनाला जोडणारा हा विकासाचा महामार्ग असल्याचे मत यावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने शिर्डी इंटरचेंज येथे नागपूर येथील सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री श्री. विखे-पाटील बोलत होते. यावेळी खासदार सदाशिवराव लोखंडे, डॉ.सुजय विखे पाटील, आमदार सिमा हिरे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, कार्यकारी अभियंता यशवंत पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०१६ मध्ये मुख्यमंत्री असतांना समृद्धी महामार्गाची घोषणा झाली आणि प्रत्यक्ष कामाला त्यांच्या काळात सुरुवात झाली. त्यावेळी आपल्या विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्ते विकास विभागाचे मंत्री होते. या उभयतांनी समृध्दी उभारणीसाठी कष्ट घेतले. विक्रमी अशा कमी वेळेत भूसंपादन केले.
मुंबई ते नागपूर ७०१ किलोमीटरचा हा महामार्ग चार विभागांतील १० जिल्ह्यांमधून जात असल्याने त्या भागातील विकासाला मोठी गती मिळणार आहे. शेती विकासाला उपयुक्त ठरणार असून, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश मधील शेतकरी आपला उत्पादित माल थेट मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेवू शकणार आहेत. शेती – कृषी मालाची निर्यात होणार असल्याने औद्योगिकीकरणाला चालना मिळणार असल्याचा विश्वास ही महसूलमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
खासदार श्री.लोखंडे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विकासाला प्राधान्य देऊन काम करत आहे. समृद्धी महाराष्ट्राबरोबर नगर जिल्ह्याची भाग्यरेषा ठरणारा प्रकल्प आहे.
खासदार डॉ.विखे-पाटील म्हणाले, समृध्दी महामार्गाला जोडूनच सुरत -हैद्राबाद हा ग्रीन फिल्ड महामार्ग जाणार आहे. नगर-मनमाड महामार्गाचे काम जानेवारी २०२३ पासून सुरू होत आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याला गतिशिल रस्त्यांचे जाळे उभे राहणार आहे. त्यातून विकासाला चालना मिळणार आहे.
प्रास्ताविकात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे प्रकल्प संचालक विश्वनाथ सातपुते म्हणाले की, समृद्धी महामार्गावर मुंबई ते नागपूर दरम्यान २४ इंटरचेंज (प्रस्थान मार्ग) आहेत. यात शिर्डी इंटरचेंज सर्वात मोठा आहे. या इंटरचेंज वर १६ टोल नाके (मार्गिका) आहेत. या १६ मार्गिकेच्यावर मध्यभागी एकच आधारस्तंभ असलेली सर्वात मोठी छत्री (canopy) आहे. मनमाड- अहमदनगर, पुणतांबा – झगडे फाटा व सिन्नर-शिर्डी तीन राष्ट्रीय महामार्ग एकमेकांना समृद्धी महामार्गावर शिर्डी इंटरचेंज येथून छेदून जातात.
कार्यक्रमानंतर लगेचच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून एक हजार ज्येष्ठ नागरिकांना विविध दिव्यांग साधनांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
---------
शहरात भाडे तत्वावर इमारतीसाठी इमारत मालकांनी प्रस्ताव पाठवावे