। अहमदनगर । दि.18 डिसेंबर । स्टेशन रस्त्यावरील आगरकर मळा परिसरातील बेलेश्वर कॉलनी येथे एका आईस्क्रीम बनविणार्या कंपनीत शुक्रवारी पहाटे मोठी आग लागली. या आगीत कंपनीतील आईस्क्रीम बनविण्याच्या साहित्यासह तेथील रेफ्रिजरेटरचे तब्बल 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद कोतवाली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
कुमार श्यामलाल नारंग (रा. बेलेश्वर कॉलनी, आगरकर मळा) यांच्या मालकीची रियल आईस्क्रीम बनविणारी कंपनी आहे. कंपनीच्या तीन मजली इमारतीमध्ये शुक्रवारी पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. नागरिकांनी अग्निशामक दलाला व कोतवाली पोलिसांना माहिती दिली.
महापालिकेच्या अग्निशामक दलासह कोतवाली पोलिस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग मोठी असल्याने नगर शहरासह एमआयडीसी व लगतच्या तालुक्यातील अग्निशामक दलाची वाहने बोलाविण्यात आली होती.
पाण्याचा अखंड मारा केल्याने शुक्रवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. आगीत कंपनीमधील बहुतांश साहित्य जळून खाक झाले. पाच ते सहा मोठे रेफ्रिजरेटर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्याचे पूर्णपणे नुकसान झाले. दरम्यान, या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
फॅक्टरीतील 16 डिफ्रिज, 12 आईस्क्रिम मशिनरी, आईस्क्रिम पॅकींग मटेरियल, 1 स्टील टेबल, 4 लोखंडी रॅक असे एकुण 25 लाख रुपये किंमती सामान जळून नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या जळीतामध्ये कोणतीही मनुष्य हानी झालेली नाही.
--------
दिल्लीगेट परिसरात लाखो रुपयांचा गुटखा जप्त
समृध्दी महामार्गावर नागपूर ते शिर्डी दरम्यान धावली पहिली एसटी बस !