एकनाथ शिंदे यांनी नैतिकता पाळून आषाढीच्या मुख्य शासकीय पूजेला जाऊ नये : गिरीश जाधव


। अहमदनगर । दि.06 जुलै 2022।  शिवसेनेची पक्षशिस्त मोडून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश झुगारून बंडखोर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळवली तरी सभागृहातील बहुमत ग्राह्य धरायचे कि नाही याबाबत सर्वोच्च्य न्यायालयात एक याचिका प्रलंबित आहे. या याचिकेची सुनावणी येत्या 11 जुलै रोजी होणार आहे.

तत्पूर्वी आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पदभार देखील स्वीकारला परंतु न्यायालयाचा निकाल अद्याप येणे बाकी असल्याने नैतिकतेच्या मुद्द्यावर आपण येत्या आषाढी एकादशीला मुख्य शासकीय पूजा करण्यासाठी जाऊ नये असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी म्हंटले आहे.     

याविषयी त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. शिवसेनेत फोडाफोडीचे राजकारण सुरु झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा असल्याचे फलक गिरीश जाधव यांनी सर्वप्रथम लावले होते आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.   

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी हातमिळवणी करीत सत्ता मिळवली असली तरी ते बंडखोर आहेत. त्यांनी पक्षाची शिस्त मोडली आहे. त्यांना मदत करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या कंपूने आमचे दैवत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना बदनाम करणारी वक्तव्ये केली.

आमच्या शिवसैनिक आमदारांच्या मागे इडी चा ससेमिरा लावला. आणि शिवसेनेतील एक गट फोडून सत्ता काबीज केली. प्रत्यक्षात ओरिजिनल शिवसैनिक आम्ही असून जे गेले ते कावळे आहेत आणि आम्ही उरलेले शिवसेनेचे खरे मावळे आहोत. आणि त्यांचे मुख्यमंत्री पद कायम राहणार की नाही याचा फैसला येत्या 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.

तोपर्यंत शिंदे यांनी मुख्य शासकीय पूजेसाठी पंढरपूरला जाऊ नये. सर्वोच्य न्यायालयाचा न्यायनिवाडा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना मुख्यमंत्री मानणार नाही असे त्यांनी म्हंटले आहे. शिवसेना हा एक शिस्त असलेला पक्ष आहे. शिवसेनेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा शब्द प्रमाण आणि अंतिम मानला जातो.

मागील अडीच वर्षात शिंदे यांनी उद्धव साहेबांबरोबर खांद्याला खांदा लावून काम केले. सुखात चाललेला तीन पक्षांचा संसार मोडण्यासाठी भाजपाने अमाप पैसे ओतले.ई डी, सी.बी.आय आणि आय टी च्या कारवायांचा ससेमिरा शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांच्या मागे लावला आणि सत्त्तांतर घडवून आणले.

पण हे बेकायदेशीर असून हे सरकार आम्हाला मान्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूरला जाऊन पूजा करू नये. ते नैतिकतेला धरून नाही. असे जाधव यांनी म्हंटले आहे. सरकार पाडण्यासाठी गनिमी काव्याचा वापर केल्याची वक्तव्ये केली जात आहेत.

पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी गनिमी कावा शत्रुपक्षाला जेरीस आणण्या साठी वापरला परंतु आपण हा गनिमी कावा आपल्याच पक्षाशी गद्दारी करण्यासाठी आणि खुर्ची मिळवण्यासाठी वापरला हे एक कटू सत्य आहे. व्यक्ती पेक्षा पक्ष कधीपण मोठाच असतो.

पैसा धाक दपटशा आणि छल कपट करून आपण सत्ता मिळवली खरी पण ही सत्ता आपण सामान्य शिवसैनिक आणि पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून मिळवली जी नैतिकतेला धरून नाही त्यामुळे आपण आषाढीला पांडुरंगाच्या दरबारी जाऊन आमच्या आराध्याची फसवणूक करू नये असे ते म्हणाले.  

---------

👉 अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणे पडले महागात

👉 जिल्हाभर अतिमुसळधार पाऊस कायम; पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट

👉 जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १८ जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

Post a Comment

Previous Post Next Post