मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश

। अहमदनगर । दि.03 जुलै 2022। समाजकल्याण विभागाच्या जिल्ह्यातील 18 शासकीय वसतिगृहांचे प्रवेश सुरू झाले असून, इयत्ता 8 वी पासूनच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना यात प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी वसतिगृह प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग व अनाथ प्रवर्गातील शालेय विद्यार्थ्यांना इ.8 वी पासून पुढे इ.10 वी पर्यंत प्रवेश घेता येतो. (अपवाद : मांग/ मेहतर प्रवर्गातील विद्याथार्ंना इ.5 वीपासून पुढे 10 वीपर्यंत प्रवेश घेता येतो) शालेय विद्यार्थ्यांसाठी 15 जुलै 2022 पर्यंत प्रवेश अर्ज भरण्याची मुदत आहे. 

कनिष्ठ महाविद्यालय प्रवर्गात इ. 11 वी च्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घेता येतो. हे प्रवेश अर्ज भरण्याची मुदत 30 जुलै 2022 आहे. बिगर व्यावसायिक महाविद्यालय विभागात बी.ए./बी.कॉम /बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या आणि एम.ए./एम. कॉम./एम.एस्सी. इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची मुदत 24 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमास पदवी/पदविका/पदव्युत्तर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 30 सप्टेबर 2022 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता देण्यात येतो. विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल, तेथून अर्ज प्राप्त करून आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विद्यार्थ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहीत वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह सबंधित वसतिगृहातच सादर करावेत, अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतिगृह तसेच अहमदनगर सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन देवढे यांनी केले आहे.  

Post a Comment

Previous Post Next Post