बालिकाश्रम रोडवर घरफोडी करत लाखाचा ऐवज लंपास

। अहमदनगर । दि.24 जुलै 2022 । अहमदनगर शहरातील दिल्लीगेट परिसरातील दुकानदाराचे बालिकाश्रम रोडवरील घर अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा फोडून 90 हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागीने असा 1 लाखापेक्षा जास्त किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी (दि.22) सकाळी 11 ते दुपारी 4 या कालावधीत घडली. 

याबाबत संजय पोपटलाल सावज (रा. वसंतविहार अपार्टमेंट, बालिकाश्रम रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सावज यांचे बालिकाश्रम रोडवर घर तर दिल्लीगेट परिसरात दुकान आहे. घरात त्यांची वृद्ध आई असते मात्र त्या अंध आहेत. त्यामुळे सावज हे दररोज दुकानात येताना घराला कुलूप लावून येतात. 

शुक्रवारी नेहमीप्रमाणे ते घराला बाहेरुन कुलूप लावून दुकानात आले त्यानंतर दुपारी घरी गेले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात जावून आईला विचारणा केली असता दुपारी घरात कोणीतरी आल्याचा आवाज झाल्याचे त्यांनी सांगितले. 

मात्र कुटुंबातीलच कोणीतरी असावे, असा त्यांचा समज झाला. मात्र ते कुटुंबातील नव्हते तर अज्ञात चोरटे होते. त्या चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेली 90 हजारांची रोकड व सोन्याचे दागीने असा ऐवज भरदिवसा चोरुन नेला. चोरीची घटना निदर्शनास आल्यानंतर सावज यांनी सायंकाळी तोफखाना पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि.क. 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

-------------

👉 नागरदेवळे नगर परिषदेला पाच कोटींच्या निधीचा बार फुसकाच...

👉 लोक पुरात वाहून गेल्यानंतर सीना नदीची नालेसफाई होणार का : भुतारे 

👉मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान : मुख्यमंत्री 

Post a Comment

Previous Post Next Post