कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याने केली आत्महत्या


। अहमदनगर । दि.09 जुलै 2022। लांबलेल्या पावसाने दुबार पेरणीचे ओढवलेले संकट आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर यामुळे आलेल्या नैराश्यातून शेतकर्‍याने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील पारगाव मौला गावच्या शिवारात गुरुवारी (दि. 7) सायंकाळी घडली. ज्ञानेश्वर कोंडीबा कांबळे (वय 45, रा. पारगाव मौला ता.नगर) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. 

मृत कांबळे हे गावच्या शिवारात शेतातील वस्तीवर राहतात. त्यांनी घराच्या पाठीमागे शेतात असलेल्या बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. ही बाब त्यांच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे घोषित केले.

मृत कांबळे यांच्यामागे वडील, पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, 3 भाऊ असा परिवार आहे. कांबळे यांच्या आत्महत्येमागे या वर्षी पाऊस लांबल्याने दुबार पेरणीचे ओढवलेले संकट आणि डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर हे कारण असल्याची चर्चा गावच्या परिसरात सुरु आहे. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात सी.आर.पी.सी.174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

-------------

👉 अमरनाथला गेलेले अहमदनगरचे यात्रेकरून सुखरूप....

👉 केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार : मुख्यमंत्री

👉  महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या सदस्यांना शपथ

Post a Comment

Previous Post Next Post