। अहमदनगर । राहुरी । दि.01 जुलै । मृत पत्रकार रोहिदास दातीर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून एक लाख रुपयांचे दागिने व ८० हजारांची रोकड व काही कागदपत्रांची चोरी झाली आहे. २९ जूनला घरफोडीची ही घटना घडली. दातीर यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने सर्व कुटुंब घराला कुलूप लावून कुरणवाडी येथे गेले होते.
या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी रात्री घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील एक लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड तसेच मृत रोहिदास दातीर यांच्या फाईलमध्ये असलेले कागदपत्रे चोरून नेण्यात आली.
गुरुवारी सकाळी घरफोडीची माहिती मिळताच सविता दातीर यांनी कुरणवाडी येथून घराकडे धाव घेतली. घरफोडी होऊन सामान अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसून आले. घटनास्थळी राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोलिस नाईक शिवाजी खरात, नगर येथील फॉरेन्सिक लॅबमधील सहायक पोलिस निरीक्षक माधुरी लेंगरे, पोलिस नाईक जयराम जंगले, संतोष आरू तसेच श्वान पथकातील पोलिस उमेश गोसावी व रक्षा नामक श्वान हे घटनास्थळी दाखल झाले.
रक्षा श्वान घरामागील शंभर फूट अंतरापर्यंत माग काढत तेथेच घुटमळले. घरफोडीच्या या घटनेत मृत पत्रकार रोहिदास दातीर यांची कागदपत्रे असलेल्या फाईल्स चोरी झाल्याने पुन्हा एकदा दातीर हत्याकांड चर्चेत आले. या घटनेबाबत सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
----------
👉 महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री होणार एकनाथ शिंदे
👉 २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्टला मतदान
👉 जिल्ह्यातील सात ग्रामसेवकांवर गंभीर शिक्षा तर तीन ग्रामसेवकांवर सेवा निलंबनाची कारवाई....
****