। मुंबई । दि.25 जुन 2022 । शिवसेनेने अनेक पराभव झेलले असून या संकटातूनही पुन्हा उभे राहू, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना पुन्हा एकदा भावनिक साद घातली. शिवसेना भवनावर आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते ऑनलाइन बोलत होते.
राज्यभरातून ८५ पदाधिकारी त्यात प्रत्यक्ष व ऑनलाइन सहभागी झाल्याचा दावा सेनेतर्फे करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे चिन्ह आणि ठाकरेंचे नाव न वापरता जगून दाखवा, असे आव्हानही त्यांनी बंडखोरांना दिले.
जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व महानगरप्रमुख यात उपस्थित होते. दोन गंभीर शस्त्रक्रियांमुळे भेटणे शक्य झाले नसल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री भेटत नाहीत, उपलब्ध नाहीत ही त्यांच्याबद्दलची एक नाराजी बंडखोर मंत्री आणि आमदारांनी व्यक्त केली आहे.
निम्मे मंत्री आणि आमदारांनी साथ सोडल्यावर उद्धव ठाकरे यांची भिस्त आता शिवसैनिक व त्यांचे संघटन करणारे स्थानिक पदाधिकारी यांच्यावर आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, नगरसेवक यांच्याशी त्यांनी ऑनलाइन संवाद साधला. या वेळी युवा नेते आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, खासदार विनायक राऊत आणि पदाधिकारी उपस्थित होते.
नगरविकास हे खाते मुख्यमंत्र्यांकडे असते, पण आम्ही दुसऱ्याला दिले. साधी खाती माझ्याकडे ठेवली. तुमचा मुलगा खासदार, पण माझ्या मुलाने काही केले तर ते का चालत नाही? मला या सगळ्या गोष्टींचा वीट आला आहे, पण हीच वीट मी इतरांच्या टाळक्यात हाणणार. वर्षा सोडला आहे, जिद्द सोडलेली नाही. अनेकदा पराभव पाहिलेत. मला पराभवाची भीती नाही. भाजपने साधलेला डाव आहे. आपण सर्व मिळून शिवसेना पुन्हा उभी करू. पूर्वी भाजपबरोबर गेलेले नष्ट झालेले आहेत. अनेक प्रादेशिक पक्ष त्यांनी संपवले आहेत.
---------------
👉 ‘काळ कसोटीचा आहे, पण संघर्ष आम्हाला नवीन नाही’, नगरमध्ये लागले फलक
👉 शिवसेनेचा ढाण्या वाघ आमदार गुलाबराव पाटील गुवाहाटीला पोहोचले