जिल्ह्यात उद्यापासून कृषी संजीवनी मोहीम
। अहमदनगर । दि.24 जुन । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात २५ जून ते १ जुलैदरम्यान कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत खरीप हंगामाच्या यशस्वितेसाठी आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषी मित्र बांधावर जात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे दिली आहे.
२६ जून- पौष्टिक तृणधान्य दिवस. पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व विशद करणे, तृणधान्य पिकांचे लागवड तंत्रज्ञान (उदा. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई आदी), तृणधान्य पिकांचे प्रक्रिया व मूल्यवर्धन व प्रक्रिया केंद्राना प्रत्यक्ष भेटीचे आयोजन करणे व शेत तेथे पौष्टिक तृणधान्य या संकल्पनेवर प्रत्येक शेतावर काही ओळींत त्या भागातील पंरपरेने लागवड होणारे वाण निवडणे. २७ जून- महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस. महिलांचे चर्चासत्र, परिसंवाद व्याख्यानमाला आयोजित करणे व महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन करणे, पीक तंत्रज्ञान महिलांना वापरण्यायोग्य शेतीतील यंत्रसामग्रीसंदर्भात माहिती देणे व प्रक्रिया सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन करणे आणि महिलांचा सहभाग वाढविणे.
२८ जून- खत बचत दिवस. जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर करणे. यामध्ये शेतकऱ्यांना मृद व पाणी तपासणीचे महत्व विशद करणे, विविध सरळ खते वापरण्याची माहिती देणे व पिकांची खत मात्रा बनविणे, सूक्ष्म मूलद्रव्ये महत्व, विद्राव्य खते व त्यांचा वापर करणे. २९ जून प्रगतिशिल शेतकरी संवाद दिवस. प्रत्येक तालुक्यातील रिर्सोर्स बँकमधील शेतकऱ्यांना रिर्सोर्स पर्सन म्हणून आमंत्रण देऊन त्यांना अवलंबिलेले तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, यू ट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या यशोगाथा सादर करणे, कार्यशाळा घेणे व प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर क्षेत्रीय भेटीचे आयोजन करणे.
३० जून- शेतीपूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस. शेती व्यवसायपूरक जोडधंदा म्हणून फलोत्पादन संरक्षित शेती, भाजीपाला व फुलशेती लागवड, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेत तळ्यातील मत्स्य पालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, सहकार, खादी व ग्रामउद्योग आदी विभागांच्या तंत्रज्ञान व योजनांची माहिती देणे. १ जुलै- कृषी दिवस. या दिवशी कृषी संजीवनी सप्ताह आणि कृषी दिन साजरा करणे व त्याचे महत्व विशद करणे व मोहिमेचा समारोप होईल.
या मोहीमेत वेबिनार, शेतीशाळा, घोंगडी बैठका, प्रात्यक्षिके, शिवार फेरी, विविध विषयांवरील प्रशिक्षण या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे. यासाठी राहूरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर (ता.राहाता) व दहिगाव ने. (ता.शेवगाव) येथील शास्त्रज्ञांची मदत घेतली जाणार असून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान बांधावर उपलब्ध होणार आहे.
यासाठी कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी हे ठिकठिकाणी उपस्थित राहाणार आहेत. कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता १ जुलै च्या कृषी दिनी जिल्हास्तरावर कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमामध्ये जिल्हातील खरीप व रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेतील जास्त उत्पादन घेणारे शेतकरी तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे शेतकऱ्यांचा सन्मान जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित होणार आहे. कृषि संजीवनी सप्ताहामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन ही श्री.जगताप यांनी केले आहे.
Tags:
Ahmednagar