साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर लक्ष द्यावे, त्याशिवाय तरणोपाय नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
येडेश्वरी साखर कारखान्याच्या आसवणी (डिस्टीलरी) ६० केएलपीडी विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन
। बीड । दि.08 एप्रिल । साखर कारखान्यांनी कालानुरूप बदल करणे आवश्यक आहे. कारखान्यांनी उसापासून साखरेसह इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा. तसेच, कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर लक्ष केंद्रित करावे, त्याशिवाय तरणोपाय नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज केले.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील आनंदगाव (सा.) येथील येडेश्वरी साखर कारखान्याच्या आसवणी (डिस्टीलरी) या ६० किलो प्रति दिवस क्षमता असलेल्या विस्तारित प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, येडेश्वरी साखर कारखान्याचे अध्यक्ष बजरंग सोनवणे, ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प.महादेव महाराज बोराडे, माजी आमदार अमरसिंह पंडित आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
बीडसह 10 जिल्ह्यात ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी 41 ठिकाणी संत भगवानबाबा वसतिगृहे सुरू करण्यात येत आहेत. या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन व शिक्षणाची व्यवस्था होणार आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जवळपास 232 साखर कारखान्यांसाठी 9 ते 10 लाख मजूर ऊसतोडणी करतात. ऊसतोड मजुरांची पुढची पिढी चांगले जीवन जगू शकेल,
यासाठी नुकतेच लोकनेते गोपिनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सुरू करण्यात आले आहे. या महामंडळासाठी साखर कारखाने व शासन यांच्याकडून जवळपास 200 कोटी रुपये रक्कम जमा होईल. हा निधी गरजवंतांच्या कल्याणासाठीच वापरला जाईल, याची काळजी घ्यावी. पर्यावरण, वन विभाग, शेतकरी बांधव व इतर महामंडळांच्या माध्यमातून त्या त्या समाजातील जनता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावी, यासाठी काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.