। अहमदनगर । दि.08 एप्रिल । प्रतिनिधी । मित्राबरोबर पोहायला गेलेल्या केतन शशिकांत लोंढे या 14 वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. तालुक्यातील काष्टी येथे ही घटना घडली.
केतन सकाळी सात ते दुपारी साडेबारापर्यंत शाळेत होता. शाळा सुटल्यानंतर दुपारी एक वाजता आठ ते दहा मुले राहुल नलवडे यांच्या शेतातील विहिरीवर पोहायला गेले.
केतन हा नुकताच पोहायला शिकला होता. दोन तास पोहून झाल्यानंतर केतन पुन्हा विहिरीत गेला. तो कुठे दिसेना म्हणून अमोल मोटे, जीवन कापडे, अमोल देशमुख, गोटु गवते, बंडू चोभे यांनी विहिरीत उड्या मारुन त्याचा शोध घेतला.
परंतु नुकतेच घोडचे पाणी आवर्तन येऊन गेल्याने विहिरीची पाणी पातळी वाढल्यामुळे जमीन लेवलला पाणी असल्याने तरुणांना पाण्यात खोलपर्यंत जाता येईना. त्यावेळी अनेकांची खात्री झाली केतन बुडाला.
अधिकार्यांना विनंती करुन वीज आल्यानंतर विहिरीवर पाच विद्युत पंप जोडून पाणी उपसले. सायंकाळी चार वाजता केतनचा मृतदेह विहिरीत सापडला. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
---------------
खालील बातम्या देखील वाचा...
शरद पवारांच्या घराबाहेर एसटी कर्मचार्यांचे अचानक आंदोलन