राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण

। सांगली । दि.02 एप्रिल ।  देशात ज्या कर्तुत्ववान महिला होऊन गेल्या त्या नामावलीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव नेहमीच श्रेष्ठ आहे. त्या सामान्य कुटुंबातून आल्या आणि राज्यकर्त्या झाल्या. त्यांनी समाजातील गरीब वर्गाला आत्मविश्वासाने उभे करण्यासाठी राज्यकारभार केला, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी केले. 

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन समाजासाठी क्रांतीदर्शी असून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने उभे केलेले त्यांचे स्मारक समतेचे व न्यायाचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विचारांचा वारसा घेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्ह्यात आणि राज्यात आपण काम करत आहोत असे सांगून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने उभारलेले त्यांचे स्मारक हे श्रध्देचे आणि विश्वासाचे प्रतिक असल्याचे सांगितले. 

सांगली शहरात रघुवंश सोसायटी, शाहूनगर,‍ विजयनगर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री व खासदार शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

राजमाता जिजाऊ, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजाला दिशा दिली, असे सांगून खासदार शरद पवार म्हणाले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शेती, उद्योगाबरोरबच विणकामालाही चालना दिली. घाट, धर्मशाळा, मंदिरे यांची निर्मिती केली. आपल्या राज्यात अनेक जाती धर्माचे लोक सलोख्याने रहावेत यासाठी त्यांनी अखंडपणे कटाक्ष पाळला. 

राजमाता अल्यिादेवी होळकर यांच्या जीवनात अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. पती, सासरे यांच्या निधनानंतरही त्या डगमगल्या नाहीत. जेव्हा राज्याची जबाबदारी त्यांच्यावर आली तेव्हा त्यांनी सामान्य माणसांसाठी राज्य चालविले आणि आदर्श पध्दतीने राज्यकारभार केला. त्यांचा आदर्श घेवून सर्वांनी वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Post a Comment

Previous Post Next Post