ओळख पटविण्याचे नागरिकांना आवाहन
। अहमदनगर । दि.06 एप्रिल । नगर-पुणे रोडवरील कामरगाव घाटात झालेल्या रस्ता अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या 35 ते 40 वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा उपचारापूर्वीच जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवारी दिनांक 3 एप्रिल रोजी घडली.
या रस्ता अपघातातील अनोळखी जखमीस नागरिकांनी खासगी अॅम्ब्युलन्समधून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराकरीता नेले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या अहवालावरून नगर तालुका पोलिसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली. अधिक तपास पोलिस नाईक एस. एन. माने करीत आहे.
अपघातात मृत झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही. नगर तालुका पोलीस मृताची ओळख पटवण्याचे तसेच त्यांच्या नातेवाईकांची माहिती घेण्याचे काम कसोशीने करीत आहे. मृत व्यक्तीचे वर्णन वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्ष आहे.
शरीर बांधा मध्यम, वर्ण निमगोरा, उंची 168 सेंटीमीटर, चेहरा उभट, डोक्याचे केस काळे, अर्धे टक्कल पडलेले, नाक सरळ व दाढी केलेली, मिशी बारीक व काळी अंगात राखाडी रंगाची पँट, विटकरी रंगाचा बेल्ट, निळ्या रंगाची अंडरवेअर घातलेली आहे.
या वर्णनाच्या व्यक्तीस अगर त्याच्या नातेवाईकांना कोणी ओळखत असेल वा त्यांचे नाव-पत्ता माहीत असेल, त्यांनी नगर तालुका पोलिस ठाणे (फोन नंबर 0241-2416122) या फोनवर संपर्क करावा, असे आवाहन नगर तालुका पोलिसांनी केले आहे.