। मुरूम । दि.04 एप्रिल । जगद्गुरू विश्वाध्याय ज्ञान सिंहासन महापीठ,जंगमवाडी मठ,काशी उत्तर प्रदेश या पिठाकडुन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज माधवराव पाटील यांना रविवारी (दि 3) काशी येथे समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.जगद्गुरू विश्वाध्याय ज्ञान सिंहासन महापीठ,जंगमवाडी मठ,काशी यांच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जगद्गुरू विश्वाध्याय ज्ञान सिंहासन महापीठ,जंगमवाडी मठ,काशीचे जगद्गुरु श्री डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी काशी जगद्गुरु पिठाचे उत्तराधिकारी म्हणून सोलापूर होटगी मठाचे महास्वामी श ब्र मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामी यांची निवड केली आहे.यानिमित्त रविवार (दि 3) पासून काशी पीठ येथे देशातील विविध मठाचे मठाधिपती संत महात्म्यांच्या उपस्थितीत नूतन जगद्गुरुंच्या पट्टाभिषेख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 42 दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.
या कार्यक्रमात रविवारी (दि 3) काशी पिठाचे जगदगुरु श्री डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी नूतन जगद्गुरु श्री डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामी,श्री गंगाधर शिवाचार्य स्वामी,माजी केंद्रीय गृह मंत्री शिवराज पाटील चाकुकर,
केंद्रिय राज्य मंत्री भगवंत खुब्बा,काशी पिठाचे ट्रस्टी तथा उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापुराव पाटील,पुणे येथील उद्योजक बाबासाहेब कल्याणी आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी जगद्गुरू विश्वाध्याय ज्ञान सिंहासन महापीठ,जंगमवाडी मठ,काशी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी पाटील परिवाराकडून सौर उर्जा प्लँट बसवुन देण्यात आले.