। अहमदनगर । दि.01 एप्रिल । उड्डाणपुलाचे काम करताना ठेकेदार कंपनीच्या कामगारांनी कामात हलगर्जीपणा करून महामार्गावरील महावितरणच्या भूमिगत उच्चदाबाच्या केबल तोडल्या. यामध्ये महावितरणचे 65 हजाराचे नुकसान झाले.
याप्रकरणी महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकासह इतर कामगाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणचे सहाय्यक अभियंता स्वप्नील संजयराव उल्हे (वय 33, रा. वसंत टेकडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, दि.29 मार्च रोजी सकाळी दहा ते अकरा या दरम्यान ही घटना घडली.
अशोका फिडरवरील पीडब्ल्युडी कार्यालयाजवळ कोठला स्टँड ते सक्कर चौक दरम्यान असलेल्या महामार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम एम/एस दिनेशचंद्र आर. अग्रवाल इंन्फ्राकॉन प्रा. लि. या कंपनीमार्फत सुरू आहे.
या कंपनीच्या कामगारांनी सदर उड्डाणपुलाचे जेसीबीने काम सुरू असताना, महामार्गावरील महावितरण कंपनीच्या भूमीगत उच्चदाब वाहिनीची केबल कामात हलगर्जीपणा करून तोडल्या.
तसेच कंपनीचे 65 हजार रूपयांचे नुकसान केले. उड्डाणपूल बांधकाम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 17 तास वीज पुरवठा खंडित राहिल्यामुळे महावितरणच्या महसुलात तूट झाली आहे.
सदर परिसरातील तुटलेल्या उच्चदाब विद्युत वाहिनीमध्ये वीज पुरवठा सुरू असलेली दोन भूमिगत विद्युत वीज वाहिन्या तोडून तेथून जाणार्या- येणार्या व तेथे काम करणार्या लोकांच्या जिवीतास धोका निर्माण केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
----------------
खालील बातम्या देखील वाचा...
मंत्रिमंडळ निर्णय : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात वाढ
मंत्रिमंडळ निर्णय : अहमदनगरसह राज्यात १४ कौटुंबिक न्यायालयांना कायमस्वरुपी मान्यता