। अहमदनगर । दि.27 मार्च । रंगपंचमीच्या दिवशी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणातून चौघांनी तिघांना लाकडी दांडके, दगडाने मारहाण केली. मारहाणीत भैरवनाथ शंकर वाकळे (वय 27, रा. बोल्हेगाव) हे जखमी झाले आहेत तसेच दगडाबाई शंकर वाकळे व दीपाली गणेश वाकळे (रा. बोल्हेगाव) यांना मुका मार लागला आहे. बोल्हेगाव उपनगरात ही घटना घडली.
भैरवनाथ वाकळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात दिलीप मार्तंड वाकळे, मोहन मार्तंड वाकळे, अभि मोहन वाकळे, सुरेश दिलीप वाकळे (सर्व रा. बोल्हेगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन वाकळे व फिर्यादी भैरवनाथ यांचा भाऊ गणेश वाकळे यांचे रंगपंचमीच्या दिवशी किरकोळ कारणातून वाद झाले होते.
याच कारणातून शनिवारी सायंकाळी आरोपींनी फिर्यादी भैरवनाथ यांना शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली. फिर्यादीची आई दगडाबाई, भावाची बायको दीपाली वाकळे या घराकडे पळत असताना त्यांना पाठीत दगडे लागून मुका मार लागला आहे. तसेच अभि वाकळे याने लाकडी दांडक्याने फिर्यादीला मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस नाईक धिरज अभंग करीत आहे.