डॉ.ना.ज.पाउलबुधे यांना स्मृतीदिनी अभिवादन
अण्णांचा सहवास कमी लाभला तरी त्यांनी केलेले कार्य जास्त स्मरणात राहील: साई पाउलबुधे
। अहमदनगर । दि.28 मार्च । राजकारणात आपण घराणेशाही चालत असलेली परंपरा कायम पाहतो, पण आमच्या घरात शिक्षण क्षेत्रात प्रगतीसाठी आजोबांनी सुरु केलेली परंपरा पुढे सुरु ठेवणार आहे. अण्णांचा सहवास मला फक्त सहा वर्ष लाभला तरी त्यांनी केलेले कार्य मात्र आम्हाला जास्त स्मरणात राहील, असे प्रतिपादन साई विनय पाउलबुधे यांनी केले.
सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक स्व.डॉ.ना.ज.पाउलबुधे यांचा 18 वा स्मृतीदिन वसंत टेकडी येथील पाउलबुधे शैक्षणिक संकुलनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक राजेंद्र कटारिया, संजय पवार, संस्थेचे विश्वस्त आर.डी.बुचकुल, आर.ए. देशमुख, दादासाहेब भोईटे, डॉ.रघुनाथ कारमपुरी, प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, अनुराधा चव्हाण, सविता सानप, बाळासाहेब बोर्डे, भरत बिडवे, तसेच मुख्याध्यापिका अनिता सिद्दम, अंजली शिरसाठ, मिरा नराल, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य संदिप कांबळे आदि उपस्थित होते.
पाउलबुधे म्हणाले, आजोबांचा सहवास मला कमी मिळाला, पण त्यांनी शैक्षणिक कार्यात जे काम केले ते विसरु शकणार नाही. समाजातील वंचितांना शिक्षण देण्यासाठी अण्णांनी नि:स्वार्थपणे काम केले, त्यामुळेच आज डॉ.पाउलबुधे शैक्षणिक संकुलन उभे राहिले. या माध्यमातून सर्वसामान्य कुटूंबाना आधार झाला, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आर.डी.बुचकुल, आर.ए.देशमुख यांनी डॉ.नाथ हे खरोखरच अनाथांचे नाथ होते, त्यांचे नाव त्यांनी प्रत्यक्षा जीवनात सार्थ करुन दाखवले. 1988 मध्ये दोन मुलं व एक पत्र्यांची खोली अशा परिस्थितीत त्यांनी शैक्षणिक धोरणास सुरुवात केली. आमदार असतांना विडी कामगार, हमाल अशा लोकांच्या मुलांसाठी शाळेला मान्यता मिळविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना साकडे घातले. त्यांच्या या नि:स्वार्थ भावनेमुळे विद्यालयाला मान्यता मिळाली, अनुदान मिळाले. त्यांनी सुरु केलेले हे काम आज त्यांच्या मुलांनी सुरु ठेवले ही अभिमानाची बाब आहे.
प्रास्तविकात भरत बिडवे यांनी स्व.पाउलबुधे यांच्या कार्याचा आढावा घेतला. काम करतांना त्यांच्या अंगी असलेल्या विनम्रतेचा, मवाळ स्वभावाचा अनुभव कथन केला. सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे त्यांनी लावलेले रोपटे याच्या संगोपनाची जबाबदारी विनय, विनित, देवदत्त तसेच विश्वस्त मंडळाने सांभाळून वटवृक्षांत त्याचे रुपांतर झाले हा त्यांचा एक प्रक़ारे आम्हाला सर्वांना आशिर्वादच आहे, असे ते म्हणाले.
यावेळी प्रा.विश्वनाथ अदावडे, राजेंद्र कटारिया, संजय पवार, बाळासोहब बोर्डे यांनी मनोगत व्यक्त करतांना त्यांच्या सहवासात आलेल्या सुख-दु:ख प्रसंगांना आठवणीमधून उजाळा दिला. या स्मृतीदिनाचे नियोजन प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा यांनी केले होते. सूत्रसंचालन अमृता रत्नपारखी, अर्पणा केसकर यांनी केले तर प्राचार्य संदिप कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.
Tags:
Ahmednagar