। अहमदनगर । दि.28 मार्च । शहरातील सर्जेपुरा परिसरात एका व्यावसायिकाला किरकोळ कारणातून लाकडी बॅट व स्टम्पने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात तीन जणांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजीम उर्फ आज्जू वजीर शेख (रा. फुलार गल्ली, माळीवाडा, अ.नगर) असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसीम गुलाम सय्यद (रा. सर्जेपुरा, अहमदनगर) व त्याचे दोन अनोळखी मित्र (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजीम शेख हे सर्जेपुरा येथील भाकरे गल्लीमधील दुकानात गेले असता त्याठिकाणी वसीम सय्यद व त्याचे दोन मित्र आले आणि काहीएक कारण नसताना शिवीगाळ करून त्यांनी फिर्यादीला धक्काबुक्की केली. त्यानंतर अजीम शेख सर्जेपुरा येथील हरीओम मोटर्स येथे थांबले असता वसीम सय्यद व त्याच्या दोन मित्रांनी फिर्यादीला लाकडी बॅट व स्टम्पने मारहाण केली.
या मारहाणीत फिर्यादीच्या नाका-तोंडातून रक्त आल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी उपचार घेवून तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पुढील तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.