गावातील शाळा सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे

। अहमदनगर । दि.30 मार्च ।  जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत आहे. या शाळेत शिकून आज अनेकजण मोठे अधिकारी झालेले आहेत. त्यामुळे सर्वांनी आपल्या गावातील शाळा सक्षम होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शाळांना आर्थिक नव्हे तर वस्तू रुपाने भेटी दिल्यास शाळांचा गुणवत्ता आलेख उंचविण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी केले.

सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त रोहित प्रकाश जोशी यांनी वडील सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश जोशी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त देवगाव व सावतानगर जिल्हा परिषद शाळेला वस्तू भेट दिल्या. देवगाव येथील शाळेत झालेल्या वस्तुंच्या लोकापर्ण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्य प्रियांका जोशी, गटविकास अधिकारी रेश्मा होजगे, गुप्तचर विभागाचे सहाय्यक अधिकारी अवधूत शिंदे, लेखाधिकारी रमेश कासार, गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे, विस्तार अधिकारी रामनाथ कराड रामनाथ, केंद्रप्रमुख सुनंदा शिंदे, विजयराव वामन यांच्यासह जोशी परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते सावतानगर शाळेला कॉम्प्युटर व प्रिंटर, कपाट, दोन्ही वर्गांमध्ये फ्लेक्स, खुर्च्या ,पाण्याची मोटर, एलईडी टीव्ही, खेळाचे साहित्य आदी साहित्य देण्यात आले. तसेच देवगाव शाळेला व्हाईट बोर्ड, माइक सेट, खेळाचे साहित्य, वॉटर प्युरिफायर ,कॉम्प्युटर व प्रिंटर आदी साहित्य देण्यात आले.

लांगोरे म्हणाले की, उपायुक्त रोहित जोशी यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ देवगाव व सावतानगर शाळेला दिलेल्या भेटी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. त्याचा शाळेबरोबरच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख उंचाविण्यास मदत होणार आहे.  

उपायुक्त रोहित जोशी म्हणाले की, या वस्तूंमुळे शाळांच्या यंत्रसामुग्रीत थोडी भर पडलेले आहे. या साहित्याचा विद्यार्थ्यांसाठी पुरेपूर वापर करणे गरजेचे आहे.  जिल्हा परिषदेच्या शाळांनी स्पर्धेत आपले स्थान कायम टिकवून ठेवावे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक दहिफळे (सावतानगर) यांनी केले. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी आभार मानले. 

---------

खालील बातम्या देखील वाचा...

महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारास चपलांचा हार... 

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी : मुख्यमंत्री 

पत्रकार चौकात मालट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुण ठार

Post a Comment

Previous Post Next Post