। उस्मानाबद । दि.29 मार्च । उस्मानाबाद जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या पोषण आहाराच्या खिचडीत पालीचे तुकडे आढळून आले असल्याची माहिती समोर येत आहे.
ही खिचडी खाल्ल्यामुळे तब्बल 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून या प्रकारामुळे शाळेत खळबळ माजली. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील पेठसावंगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज मंगळवारी सकाळी ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
मुलांनी शाळेतील खिचडी डब्यात भरून घरी नेली होती. तेव्हा एका मुलाच्या डब्यात पालीचे मुंडके तर एकाच्या डब्यात पालीच्या शरीराचा मागील भाग आढळून आला. पालकांनी तत्काळ शाळेत येऊन शिक्षकांना या प्रकाराबाबत माहिती दिली.
मात्र तोपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप झाले होते. अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा होऊन त्रास सुरु झाला होता. दरम्यान, विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून पालक, शिक्षक आणि डॉक्टरांनी एकत्र येऊन उपाययोजना केल्याने मोठं संकट टळल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
शिवसेना आमदारांची भेट
दरम्यान, शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाला भेट दिली. विद्यार्थ्यांची चौकशी करून डॉक्टर आणि शाळा प्रशासनाला योग्य ती देखभाल करण्याच्या सूचना दिल्या. तसेच विद्यार्थी तसेच पालकांची विचारपूस केली. अशा प्रकारची घटना भविष्यात घडू नये, यासाठी शाळा प्रशासनाने पावले उचलली असल्याचे शिक्षकांनी सांगितलं. तसेच इतर शाळांमध्येही अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून पत्र पाठवण्यात आल्याचे शिक्षकांच्या वतीने सांगण्यात आले.
Tags:
Maharashtra