। अहमदनगर । दि.12 जुलै । वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरखाली सापडून मजुराचा मृत्यू झाला. श्रीरामपूर तालुक्यात ही घटना घडली. श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा होत असतो. प्रशासनाकडून कठोर कारवाई होत नसल्यामुळे वाळू तस्करांसाठी रान मोकळे झाले आहे.
याचाच परिणाम म्हणून ज्ञानेश्वर रामू दळे (वय 38 वर्षे, राहणार बाजारठाण) हा वाळू भरण्याचे काम करणारा मजूर वाळू तस्करांच्या ट्रॅक्टरखाली सापडून जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत असल्याचे घोषित केले.
वाळू तस्कराचा ट्रॅक्टर घाईघाईमध्ये वाळू भरून पळून जाण्याच्या गडबडीत असतांना ट्रॅक्टर खाली आल्यामुळे या मजुराचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास श्रीरामपूर पोलिस करीत आहे.