टाकळी ढोकेश्वर मध्ये बिबट्या जेरबंद
भक्षाच्या शोधात बिबटया घुसला नवोदय विद्यालयाच्या खानावळीत
विद्यालय बंद असल्याने मोठा अनर्थ टळला
। अहमदनगर। दि.08 जुलै । पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील स्वयंपाकगृहात अडकलेल्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले आहे. आज (दि .7 जुलै ) सकाळी 9 वाजेच्या सुमारास नवोदय विद्यालयातील कर्मचारी स्वयंपाकगृहात गेला असता त्या ठिकाणी बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला.त्याने तात्काळ प्राचार्य बोरसे यांना घटनेची माहिती दिली.
बोरसे यांनी टाकळी ढोकेश्वर वनविभागाचे रेंजर प्रताप जगताप यांना बिबट्याविषयी कळविले असता वनपरिक्षेत्र टाकळी ढोकेश्वर येथील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. राहुरी विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.जी.देवखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी ढोकेश्वर वनपरिक्षेत्र कार्यालय,ओतुर वनक्षेत्र कार्यालय तसेच माणीकडोह बिबट्या निवारा केंद्रातील अधिकारी व कर्मचार्यांनी एकत्रित रेस्क्यू ऑपरेशन राबविले.
ज्या खोलीत बिबट्या अडकला होता, ती अरुंद असल्याने तसेच जवळपास लोकवस्तीचा परीसर असल्याने बिबट्याला पकडणे जिकिरीचे होते. पण माणीकडोह बिबट्या निवारा केंद्रातील डॉक्टरांनी आपले कसब पणाला लावून बिबट्याला बेशुद्ध केले व तात्काळ उचलून पिंजर्यात जेरबंद केले.
सदर बिबट्याच्या शरीरावर काही जखमा असल्याने त्यास उपचारासाठी माणीकडोह येथील निवारा केंद्रात पाठविण्यात आले आहे. बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी राहुरी विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.जी.देवखिळे, टाकळी ढोकेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या नेतृत्वाखाली टाकळी ढोकेश्वर वनविभागाचे साहेबराव भालेकर,
एन.व्ही.गायकवाड, मारूती मोरे,व्ही.आर.थोरात, डी.पी.थोरवे, सुदाम व्यवहारे, डी.एम.भांड,दिपक रोकडे,तसेच ओतूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे योगेश घोडके, ज्ञानेश्वर पवार, अतुल वाघुले,परशुराम खोकले,ओम पवार संतोष साळुंखे तसेच माणीकडोह बिबट्या निवारा केंद्रातील निखिल बनगर व त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर यांनी सहाय्य केले.