अभिनेता डिनो मोरियावर ईडीची कारवाई !

। नवीदिल्ली । दि.03 जुलै । अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून सध्या ठिकठिकाणी धडक कारवाई सुरू आहे. शुक्रवारी ईडीने बँक घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया, काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दिकी यांच्यासह संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती जप्त केली.

यात आठ मालमत्ता, तीन वाहने, बँक अकाऊंट्स आणि शेअर्स / म्युचल फंड यांचा समावेश असून संपत्तीची एकूण किंमत 8.79 कोटी रुपये असल्याचे ईडीने पत्रकार परिषदेत सांगितले.

ईडीने म्हटले की, ’14 हजार 500 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यात फरार असलेले स्टर्लिंग बायोटेक समूहाचे प्रवर्तक नितीन संदेसरा आणि चेतन संदेसरा यांनी आपल्या गुन्ह्यातून जे धन मिळवले ते या चार जणांना दिले. त्यामुळे या चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या संपत्तीत तीन कोटी रुपयांची मालमत्ता संजय खान यांची आहे.

तर डिनो मोरियाची संपत्ती 1.4 कोटी रुपये आहे आणि डिजे अकील नावाने लोकप्रिय असलेल्या अकील अब्दुलखलील बचूअलीची संपत्ती 1.98 कोटी रुपये आहे. तर अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दिकी यांची संपत्ती 2.41 कोटी रुपयांची आहे’, अशी माहिती ईडीने दिली.

Post a Comment

Previous Post Next Post