छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पूर्णाकृती पुतळ्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली पाहणी

। पुणे । दि.09 जुलै । औरंगाबाद मधील क्रांती चौक येथे उभारावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पूर्णाकृती पुतळ्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी चित्रकल्पक आर्ट स्टुडिओ नऱ्हे-धायरी पुणे येथे आज पाहणी केली.

यावेळी आमदार अंबादास दानवे, आमदार संजय क्षीरसाठ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडे, शहर अभियंता  पानझडे, चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दिपक थोपटे आदि उपस्थित होते.

यावेळी श्री.देसाई म्हणाले, चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दिपक थोपटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बनविलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा हा एकवीस फुट उंच व बावीस फुट लांब आणि सहा टन वजनाचा आहे. हा राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरेल.

 हा पुतळा  अतिशय रेखीव व देखीव असा झालेला आहे. या पुतळ्याचे काम लवकरच पूर्ण होईल. क्रांती चौक औरंगाबाद येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आदर्श असा शिवपुतळा ठरेल, अशा भावनाही श्री.देसाई यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी स्थानिक शिवप्रेमी नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post