। मुंबई । दि.01 जुलै । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे गेले दीड वर्षे राज्यातील नाट्यगृहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे लावणी कलावंतासह इतर लोक कलावंतांची उपासमार सुरू आहे. काहींनी आतापर्यंत आत्महत्याही केल्या आहेत तर काहींचे मानसिक तणावामूळे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
तरी आम्हाला आमचा रोजगार मिळावा, आमच्या कार्यक्रमांना परवानगी मिळावी या आणि इतर मागणीकडे पावसाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यभरातील सर्व लावणी कलावंत मंगळवार ६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता मुंबई महापालिके समोरच्या आझाद मैदान येथे आक्रोश आंदोलन करणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून ही कलावंत मंडळी केवळ आमचा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी करत आहे.आमच्या कलेच्या जीवावर आम्ही आमचा उदरनिर्वाह करू अशी आर्जव सरकारनकडे करत आहे.पण सरकार त्याचा विचार करत नसल्याने आता त्यांना आंदोलन करावे लागत आहे.या लावणी कलावंतांनी सरकारकडे लवकरात लवकर मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू करावेत,
प्रत्येक कलाकाराना रोजगार उपलब्ध करावा. सर्व कलाकारांना झालेले नुकसान म्हणून काही आर्थिक मदत करावी, किमान प्रति महिना ५ हजार रुपये अर्थसहाय्य करावे, शासनाकडून कलाकारांना ओळखपत्र वितरीत करावे, सरकारी नोकरीत कलाकारांसाठी राखीव जागा ठेवाव्यात तसेच सरकारतर्फे कलाकारांचा विमा काढण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.