। अहमदनगर । दि.06 जुलै । महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या आवहानाला प्रतिसाद देत अनेक शिक्षक, शिक्षकेतरांनी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले. शिक्षण क्षेत्रातील प्रलंबीत 33 मागण्यांसाठी सतत प्रयत्नशील असूनही मागण्या मान्य न झाल्यामुळे सदरचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. राज्यातील बहुतांश शिक्षकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. सदर प्रश्नांचे निवेदन शिक्षक परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव व शिक्षण उपसंचालकांना देण्यात आल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
शिक्षक परिषदेच्या पदाधिकार्यांनी तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षणनिरीक्षक, उपसंचालक यांना मागण्यांचे निवेदन दिले. विभाग स्तरावर सातही विभागात शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात आले. तर मुंबईमध्ये राज्य स्तरावर हे निवेदन शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांना राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, आमदार नागो गाणार, मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे, अध्यक्ष उल्हास वडोदकर, वैशाली नाडकर्णी, भाऊसाहेब घाडगे, रखमा ढोणे यांनी दिले. तसेच शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन आमदार गाणार, वेणूनाथ कडू, शिवनाथ दराडे, भाऊसाहेब घाडगे यांनी निवेदन दिले. शासनाने या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास राज्य स्तरावर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
या मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, आश्वासित प्रगती योजना लागू करणे, कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करा, वरिष्ठ निवडश्रेणीचा विषय तात्काळ मार्गी लावा, अश्वासित प्रगती योजना लागू करा, आय.सी.टी. शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणे, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी त्वरित देणे, रात्र शाळांचे प्रश्न मार्गी लावणे यासारख्या 33 मागण्या शासनाकडे मांडल्या असून, या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करुन सदर प्रश्न सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहणार असल्याचे शिवनाथ दराडे यांनी म्हंटले आहे.